नरेश माळवे यांची सेनेच्या नागपूर संपर्क प्रमुखपदी निवड!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावलेले त्यांचे कट्टर समर्थक, तुमसर (जि.भंडारा) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान संपर्कप्रमुख नरेश माळवे यांची नागपूर (दक्षिण) मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माळवे यांना बढती देण्यात आली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण परिश्रम घेणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सत्ता समीकरणातील सर्व शक्यतांना धक्का देत दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तीन पायांचे हे सरकार फारकाळ टिकणार नाही असे राजकीय धुरिणांना वाटत असताना आघाडी सरकारने आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या दरम्यान राज्यावर कोरोनासह अतिवृष्टी, महापूर, अवकाळी अशी विविध संकटे एकामागून एक येत आदळली. मात्र तीन पक्षांच्या या सरकारने त्याचा मुकाबला करीत राज्यात शासन राबविण्याचा काटेकोर प्रयत्न केला. राजकारणातील शीर्ष सत्तेच्या मागे खालच्या स्तरापासूनचा विजय महत्त्वाचा मानला जातो. आगामी काळात राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु केले असून त्याचाच भाग म्हणून गेल्या कालखंडात चांगले काम करणार्या पदाधिकार्यांना बढती देण्यात आली आहे.

सरसेनापतींच्या विचाराने भारावलेले संगमनेरातील नरेश माळवे यांच्यावर यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी या मतदारसंघातील जुन्या-नव्या शिवसैनिकांना एकत्र करुन संघटना बांधणीत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्यांना बढती देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षानेते देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गज नेत्यांचा प्रभाव असलेल्या नागपूर (दक्षिण) विभागाच्या संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई व पूर्व विदर्भ विभागाचे संपर्क प्रमुख प्रकाश वाघ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
