‘अगस्ति’च्या गळीत हंगामची पूर्वतयारी समृद्धीकडून सुरू ः डॉ. लहामटे मतदान प्रक्रिया थांबल्याने समृद्धी मंडळ कारखान्यासाठी रणांगणात

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्य सरकारने पावसाचे कारण देत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली हा लोकशाहीचा घात आहे. मात्र, अगस्ति कारखाना बंद पडू नये, कारखान्यावर प्रशासक येवू नये म्हणून शेतकरी समृद्धी मंडळाने भाजप सोडून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेवून गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू केली असून कर्ज उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहे, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.

अगस्ति सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता.17) मतदान होणार होते. मात्र, राज्य सरकारने थेट निवडणुकाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अगस्ति कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकरी समृद्धी मंडळ रणांगणात उतरले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, अशोक भांगरे, अमित भांगरे, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, मच्छिंद्र धुमाळ, डॉ. अजित नवले, शांताराम वाळुंज, भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, मारुती मेंगाळ आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभेत सहकार हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे. अगस्ति कारखाना जगला पाहिजे यासाठी आवाहन केल्याने शेतकरी सभासद आपल्या समृद्धी मंडळाच्या मागे उभे होते. सांगता सभा होऊन मतदान बाकी असताना निवडणूक थांबवून हे सरकार लोकशाहीचा गळा घोटीत आहे. हा निर्णय येताच माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अध्यक्ष म्हणून न्यायालयात जाणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता निर्णय कळताच समृद्धी मंडळ न्यायालयात गेले. गायकर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याविरूद्ध दाद मागितली आहे. परंतु, न्यायालयाने अंतिम निर्णय न देता 25 जुलैला सुनावणी ठेवली आहे. मात्र या कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक होवू नये यासाठी आपण विरोधी पक्षनेते अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विनंती करणार आहे. प्रशासक नेमला तर कारखाना बंद पडेल.

दरम्यान, या निवडणुकीत समृद्धी मंडळाला वातावरण चांगले आहे तसेच जनता जो निकाल देईल तो मान्य असेल. परंतु आज कारखाना सुरू करण्यासाठी कुणाचीही वाट पाहू नका. ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे हा प्रमुख उद्देश ठेवून काम करा. जनतेला, सभासदांना सर्व माहीत आहे त्यामुळे. आपण सर्वजण मिळून मदत करून काम करुया. सोशल मीडियावर चर्चेला महत्त्व देऊ नका, भाजपचे कार्यकर्ते कसेही वागू द्या, आपली ती संस्कृती नाही, आपण एकत्रित काम करावे, असे आवाहनही आमदार लहामटे यांनी केले.
