सांभाळ करण्याच्या वादातून दोघा मुलांनी केला जन्मदात्याचा खून! शहर पोलिसांत गुन्हा दाखल; तर न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन नाहीत. या वादातून कधी आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविले जाते तर कधी वैतागून आई-वडीलच घर सोडून जातात. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे मात्र 15 ते 16 मे, 2021 च्या दरम्यान वादातून मुलांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी थेट जन्मदात्याचाच खून केला.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील माळी कुटुंब सध्या चिखली येथील एका वीटभट्टीवर कामाला आहे. वडील दशरथ माळी यांचा सांभाळ कोणी करायचा यावरून रामदास आणि अमोल या दोघा भावांमध्ये वाद होता. यावरून अनेकदा भांडणही झाले. याच विषयावरून त्यांच्यात वाद पेटला. हा वाद विकोपाला जाऊन मारामारी सुरू झाली. या वादात वडील मध्ये आले असावेत. त्यामुळे दोन्ही मुलांनी वडिलांच्या डोक्यात मारहाण केली. त्यांचा गळा दाबून खून केला. याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. दोन्ही आरोपी मुले तेथेच होती. त्यांना अटक करण्यात आली आहे. सांभाळ करण्याच्या वादातून झालेल्या भांडणात वडिलांचा खून झाल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत अनेकांचे संसार अडचणीत आले आहेत. रोजगार बुडाल्याने घर चालविणे अवघड झाले. त्यातूनच कौटुंबिक वादाचे प्रसंग वाढत असले तरी यातून जन्मदात्याचा खून झाल्याच्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्य हवालदार बी. वाय. टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी आरोपी रामदास माळी व अमोल माळी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 252/2021 भारतीय दंड विधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले हे करत आहे.