अकोले तालुक्यातील कृष्णवंतीच्या पात्रात पर्यटकांचे वाहन बुडाले! वाहनातील दोघांसह अपघात बघायला गेलेल्याचा बुडून मृत्यू; एकजण मात्र बचावला..
नायक वृत्तसेवा, अकोले
आपल्या सौंदर्याने निसर्ग पर्यटकांना भुरळ घालणार्या भंडारदरा धरणाच्या परिसरातून अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांचे वाहन वळणाचा अंदाज चुकल्याने थेट कृष्णवंती नदीच्या पात्रात जावून कोसळले. या अपघातात वाहनातील दोघांचा बुडून मृत्यू झाला तर तिसरा पर्यटक आश्चर्यकारकरित्या वाहनातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने बचावला. हा अपघात घडला त्यावेळी परिसरात पाहुणा म्हणून आलेल्या नाशिकमधील एका वृद्धाने तो पाहण्यासाठी खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता ते तोल जावून पात्रात पडले व वाहून गेले. रात्री उशिराने वाहनासह त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्या वृद्धाचा मात्र अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेने अहमदनगरसह औरंगाबाद जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील तिघेजण शुक्रवारी (ता.15) भंडारदरा धरणाच्या परिसरात आपल्या क्रेटा (क्र.एम.एच.20/ई.वाय.8887) या वाहनातून निसर्ग पर्यटनासाठी आले होते. दिवसभर धरणाच्या परिसरात निसर्ग सौंदर्य अनुभवल्यानंतर दुपारच्यावेळी ते सर्वजण कळसूबाईच्या दिशेने गेले. सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तेथून माघारी येत असताना वारंघुशी चौफुलीजवळील पेंडशेत फाट्यावरील अवघड वळण घेताना चालकाचा अंदाज चुकल्याने त्यांचे वाहन थेट प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंती नदीच्या पात्रात जावून कोसळले. हा प्रकार घडला त्यावेळी वाकी येथे पाहुणा म्हणून आलेल्या तुकाराम रामदास सांगरे (वय 72, रा.नवीन सिडको, जि.नाशिक) हे अपघात पाहण्यासाठी खाली उतरत असताना तोल जावून ते नदी पात्रात पडले व वेगवान प्रवाहासोबत वाहून गेले.
तत्पूर्वी नदीपात्रात बुडालेल्या वाहनातील अॅड. अनंता रामराव मगर (वय 32, रा.समर्थ नगर, जि.औरंगाबाद) या तरुण वकीलाने वाहनाची पाठीमागील काच फोडून आश्चर्यकारकरित्या आपली सुटका केल्याने तो बचावला. मात्र अन्य दोघेजण वाहनासह नदीपात्रात बुडाल्याने त्या दोघांचाही मृत्यू झाला. हा सर्व प्रकार शेंडी येथील राजू बनसोडे आणि दीपक आढाव या दोघांनी दूरवरुन पाहिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आसपासच्या ग्रामस्थांना अपघाताची माहिती देत मदतकार्य सुरू केले व या घटनेबाबत राजूर पोलिसांनाही कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ट्रॅक्टर व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बुडालेले क्रेटा वाहन पाण्याच्या बाहेर काढले. त्यातील दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. अपघातातून बचावलेल्या अनंता मगर यांना या घटनेचा जबर धक्का बसल्याने त्यांची मानसिक अवस्था ढासळली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. यावेळी मृत्यू पावलेल्या दोघांच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांवरुन त्यातील एकाचे नाव अॅड. आशिष प्रभाकर पालोदकर (वय 33, रा.खडकेश्वर, औरंगाबाद) व दुसर्याचे नाव रमाकांत प्रभाकर देशमुख (वय 35, व्यवसाय शेती, रा.सार्थनगर, औरंगाबाद) असे असल्याचे समोर आले.
सदरचा अपघात पाहण्यासाठी कृष्णवंतीच्या पात्राजवळ गेलेले व तोल जावून वाहून गेलेले तुकाराम सांगरे यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला, मात्र ते आढळून आले नाहीत. आज सकाळपासून राजूर पोलिसांनी पुन्हा त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून वृत्त लिहेपर्यंत अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. सदरची घटना ज्याठिकाणी घडली तेथून जवळच नदीपात्रात बंधारा घातलेला असून तो तुडूंब भरुन वाहत आहे, तर त्यापासून काही अंतरावर कृष्णवंतीवरील 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय आहे. सध्या हा जलाशयही ओसंडून वाहत असून रंधा धबधब्यावरुन त्याचे पाणी निळवंडे धरणाच्या जलाशयात स्थिरावत आहे. सदरील इसमाचा अद्यापही शोध लागत नसल्याने त्यांचा मृतदेह वाहून पुढे गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात तुफान पाऊस सुरू असून ओढेनाले आवेशाने वाहत आहेत. सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर अतिशय निसरडा झाला असून पदोपदी अपघाताची शक्यता असते. अशात साहस केल्यास त्याचे रुपांतर अपघातात होण्याची दाट शक्यता असते. या घटनेत रात्रीचा काळोख, तुफान पाऊस आणि दाट धुक्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने दोघा तरुण वकीलांसह एका वयोवृद्ध इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटनासाठी येतांना पर्यटकांनी सूर्यास्तापूर्वीच हा परिसर सोडावा असे आवाहन राजूर पोलिसांकडून करण्यात आले आहे. या अपघातात दोन तरुण वकीलांचा दुर्दैवी अंत झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.