श्रीरामपूर शहराला अतिक्रमणाचा विळखा! पालिकेची मात्र छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई..

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
वाहतुकीला अडथळा होतो म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अतिक्रमण विभागाने एका गरीब हातगाडी चालकासह कुटुंबाला थेट मुख्याधिकार्यांच्या दालनात उभे केले. परंतु शहरात अजगरासारखा पडलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पालिकेच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक गरीब व्यावसासिक हातगाडीवर संध्याकाळी पाच नंतर व्यवसाय करतो. पण या हातगाडीमुळे वाहतुकीला अडथळा येतो. म्हणून ठराविक लोकांनी पालिकेत तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन अतिक्रमण विभागाने ही हातगाडी जप्त करुन गरीब व्यावसायिकाला थेट मुख्याधिकार्यांच्या दालनात उभे केले. मात्र शहरात मेनरोड, रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, शिवाजी रोड, संगमनेर रोड, भगतसिंग चौक, वेस्टर्न चौक, राम मंदिर चौक, नेवासा रोड, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आदि ठिकाणी माजी नगरसेवक, व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या, भाजीपाला विक्रेते असतात. चोथाणी हॉस्पिटल समोरील रस्त्याला तर भाजी मंडईचे स्वरूप आलेले आहे.

मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे, चहाच्या दुकानासमोर उभी असणारी वाहने, रिक्षा, कळ्यापिवळ्या गाड्या, दुकानाचे फलक रस्त्यावर लावले जातात. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता शोधावा लागतो. नेवासा रस्त्यावर तर एकाने रस्त्यावरच म्हशीचा गोठा उभारला आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने, रिक्षा हातगाड्या उभ्या असतात. येथेही दुकानदारांचे अतिक्रमणे आहेत. मात्र, याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का? असा सवाल सामान्य नागरिक करत आहे.

अतिक्रमणामुळे वाहतुकीलाच नव्हे तर नागरिकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक महिन्यांपासून शहरातील अनेक महिला, प्रतिष्ठित नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतु प्रशासन व अतिक्रमण विभाग यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्याला केराची टोपली दाखवली. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हातगाडीवर आहे, त्याच्याविरुद्ध कुणीतरी तक्रार केली म्हणून एका गरीब कुटुंबाची हातगाडी लागली म्हणून त्याच्या विरोधात तातडीने कार्यवाही केली जाते. परंतु, बड्या धेंड्यांच्या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याकडे आता जिल्हाधिकार्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
