विजेचा तीव्र धक्का बसून उपसरपंचाचा मृत्यू! पठारभागातील पिंपळगाव देपा गावावर पसरली शोककळा

नायक वृत्तसेवा, घारगाव
सध्या सर्वत्र पावसाचे धुमशान सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी वीजधक्का व सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. तर पूरात वाहून जाण्याच्याही घटना घडत आहेत. अशातच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपाचे उपसरपंच यांना विजेचा तीव्र धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.14) सकाळी समोर आली आहे. यामुळे संपूर्ण पठारभागात शोककळा पसरली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पिंपळगाव देपाचे उपसरपंच प्रदीप गवराम गुंड (वय 33) हे काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ही वार्ता गावात पसरताच गावकर्‍यांनी तत्काळ त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर उपचारार्थ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. यानंतर कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पिंपळगाव देपा येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.

दरम्यान, मयत उपसरपंच गुंड यांचे सामाजिक व राजकीय वलय मोठे होते. तरुणांचे संघटनही मोठे होते. त्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसल्याची बातमी गावात पसरताच मोठा जमाव गोळा झाला होता. मात्र, नियतीने आधीच डाव साधल्याने त्यांना उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. सर्वजण त्यांच्या कुटुंबाला धीर देताना हळवे झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पठारभाग शोकसागरात बुडाला आहे.

Visits: 157 Today: 1 Total: 1870538

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *