चोवीस तासांत पाच धरणांमध्ये पावणेदोन टीएमसी पाणी! पाणलोटात संततधार कायम; आढळा धरण शुक्रवारी होणार ओव्हर फ्लो
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटात थैमान घालणार्या पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरला होता, मात्र ही स्थिती फारकाळ टिकली नाही. मंगळवारी काहीशी उसंत घेणार्या वरुणराजाने बुधवारी पूर्वाषाढा नक्षत्राच्या प्रारंभातच पाणलोटात पुन्हा एकदा धोऽधो बरसण्यास सुरुवात केली आहे. जोरदार पावसामुळे मुळा नदीने रौद्ररुप धारण केले असून कोतुळनजीकच्या पात्रातून चालू हंगामात पहिल्यांदाच 11 हजारहून अधिक क्यूसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. सतत कोसळणार्या तुफानी जलधारांनी संपूर्ण अकोले तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून आदिवासी पट्टा गारठला आहे तर काही भागात भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने भातशेतीचे नुकसानही झाले आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांचा पाणीसाठा समाधानकारक अवस्थेत पोहोचवला असून तालुक्याच्या उत्तरेतील 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आढाळा प्रकल्प शुक्रवारी (ता.15) ओव्हर फ्लो होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विविध वातावरणीय घडामोडींमुळे यंदा मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास काहीसा लांबला होता. त्यानंतर राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून दीर्घकाळ किनारपट्ट्यांवरच घोंघावत राहिल्याने उर्वरीत महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जूनच्या शेवटच्या सत्रात राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने बळीराजाने खरीपाच्या पेरण्या उरकल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर पुन्हा मान्सून सक्रीय झाला असून जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणार्या अकोले तालुक्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. तालुक्यातील लघु व मध्यम स्वरुपाचे दहा प्रकल्प आत्तापर्यंत ओसंडले असून मुळा, प्रवरा, कृष्णवंती व आढळा या चारही प्रमुख नद्यांना महापूर आल्याने या नद्यांवरील धरणांमध्ये होणारी पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गेल्या चोवीस तासांचा विचार करता मुळा व प्रवरा खोर्यात पावसाला अधिक जोर असून बुधवारी सायंकाळनंतर संपूर्ण पाणलोटात तुफान जलधारा कोसळत आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या बारा तासांत भंडारदरा धरणात 167 दशलक्ष घनफूट तर सायंकाळी सहा ते आज सकाळी सहापर्यंत तब्बल 617 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. गेल्या चोवीस तासांत एकट्या भंडारदर्यात 784 दशलक्ष घनफूट आवक झाली आहे. निळवंडे धरणातही कालच्या दिवसभरातील बारा तासांत अवघे 85 दशलक्ष घनफूट तर नंतरच्या बारा तासांत तब्बल 199 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. कळसूबाईच्या शिखरांवर आषाढ सरींनी तांडव घातल्याने कृष्णवंतीवरील वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन 1 हजार 574 क्यूसेक्सचा वेगावन प्रवाह रंधा धबधब्यावरुन कोसळत निळवंडेच्या जलसाठ्यात मिसळत आहे.
मुळा खोर्यातही काल सकाळपासूनच जोरदार कोसळणार्या पावसाचा जोर रात्री काहीसा मंदावला आहे. मात्र हरिश्चंद्रगड, पेठेचीवाडी, खडकी, लहीत, पाचनई, कोथळे अशा सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात संततधार कायम असल्याने बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून चालू हंगामात पहिल्यांदाच मुळानदीच्या पात्रातून तब्बल 11 हजार 152 क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे 24 तासांत मुळा धरणातील पाणीपातळी 497 दशलक्ष घनफूटाने वाढली आहे. अकोले तालुक्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाणे कमी असते. मात्र गेल्या 72 तासांपासून या भागात असलेल्या आढळा व भोजापूर या दोन्ही जलाशयांच्या पाणलोटातही पाऊस टिकून आहे. आढळा नदीच्या खोर्यात सुरू असलेल्या पावसाने काल दिवसभरात धरणातील पाणीसाठा 41 दशलक्ष घनफुटाने तर काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत 70 दशलक्ष घनफुटाने वाढवला आहे. त्यामुळे 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प उद्या शुक्रवारी (ता.15) तुडूंब होवून ओसंडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पाणलोटात धोऽधो कोसळणार्या पावसाने मंगळवारी लाभक्षेत्रातून माघार घेतली होती. मात्र बुधवारी पहाटेपासूनच लाभक्षेत्रातही सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासांत पाणलोटासह लाभक्षेत्रात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे – घाटघर 268 मि.मी., रतनवाडी 262 मि.मी., भंडारदरा 252 मि.मी., वाकी 235 मि.मी., निळवंडे 35 मि.मी., आढळा 16 मि.मी., कोतूळ 11 मि.मी., अकोले 13 मि.मी., संगमनेर 9 मि.मी., श्रीरामपूर 20 मि.मी., शिर्डी 13 मि.मी., राहाता 10 मि.मी., कोपरगाव 8 मि.मी., राहुरी 9 मि.मी. व नेवासा 17 मि.मी. धरणातील पाणीसाठे – मुळा 11 हजार 883 दशलक्ष घनफूट (45.70 टक्के), भंडारदरा 6 हजार 549 दशलक्ष घनफूट (59.32 टक्के), निळवंडे 5 हजार 188 दशलक्ष घनफूट (62.35 टक्के), आढळा 931 दशलक्ष घनफूट (87.83 टक्के) व भोजापूर 235 दशलक्ष घनफूट (65.10 टक्के).
संगमनेर तालुक्यात सरासरीच्या 145 टक्के पाऊस –
संगमनेर तालुक्याच्या दहा मंडलामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासांत पठारभागातील घारगाव, डोळासणे व साकूर मंडळात सर्वाधिक 10.3 मि.मी.पाऊस नोंदविला गेला असून शिबलापूर मंडलात सर्वात कमी 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत आश्वी 147.2 मि.मी, (117.7 टक्के), शिबलापूर 137.9 मि.मी., (110.2 टक्के), तळेगाव 211.9 मि.मी., (169.4 टक्के), समनापूर 245 मि.मी., (196.6 टक्के), घारगाव 219 मि.मी., (175.1 टक्के), डोळासणे 219 मि.मी., (175.1 टक्के), साकूर 141.7 मि.मी., (145.7 टक्के) व पिंपरणे येथे 181.8 मि.मी., (145.3 टक्के) इतका पाऊस नोंदविला गेला असून तालुक्यात सरासरी 181.8 मि.मी., (145.3 टक्के) पाऊस झाला आहे.
अकोल्यात सर्वाधिक तर राहाता तालुक्यात अत्यंल्प पाऊस –
गेल्या 1 जूनपासून जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली असून जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक 294.6 मि.मी. (165.3 टक्के) पाऊस अकोले तालुक्यात तर सर्वात कमी 129.9 मि.मी. (82.3 टक्के) पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. उर्वरीत तालुक्यांत नेवासा 215 मि.मी. (155.9 टक्के), शेवगाव 240.6 मि.मी. (155 टक्के), संगमनेर 181.8 मि.मी. (145.3 टक्के), पाथर्डी 222.3 मि.मी. (136.3 टक्के), श्रीगोंदा 160.6 मि.मी. (122 टक्के), राहुरी 176.9 मि.मी. (120.1 टक्के), कोपरगाव 173.1 मि.मी. (118.5 टक्के), पारनेर 164.1 मि.मी. (117.7 टक्के), जामखेड 215.5 मि.मी. (114 टक्के), अहमदनगर 164.8 मि.मी. (110.2 टक्के), कर्जत 132.4 मि.मी. (92.2 टक्के), श्रीरामपूर 174.5 मि.मी. (100.8 टक्के) व राहाता 129.9 मि.मी. (82.3 टक्के) इतका पाऊस झाला आहे.