व्यापारी मारहाण प्रकरणी देवळाली प्रवरात शंभर टक्के बंद! गावगुंडांवर कडक कारवाईची पोलिसांना दिलेल्या निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चहा विक्रेत्यास मंगळवारी (ता.12) गावातील काही गावगुंडांनी मारहाण केली. याप्रकरणी बुधवारी देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन निषेध सभा घेत या घटनेतील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. अन्यथा नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. या मारहाणीच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले. यावेळी नागरिकांनी पोलिसांचाही निषेध केला.

व्यापारी संघटनेचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष सतीश वाळुंज म्हणाले, शहरातील व्यापारी हे शांतताप्रिय आहेत. मात्र, कोणत्याही अपशक्ती त्यांना त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याची धमक देखील व्यापारी संघटनेमध्ये आहे. यापुढे व्यापार्यांवर केली जाणारी दमबाजी सहन केली जाणार नाही. त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा वाळुंज यांनी दिला. याचबरोबर शहरातील विद्यालये, महाविद्यालयातील तरुणींना या गावगुंडांचा नेहमी त्रास असून ते छेडछाड करतात. त्यामुळे व्यापारी भयभीत झालेले आहेत. पोलिसांनी या गावगुंडांना पकडून तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील वाळुंज यांनी केली आहे.
![]()
या संदर्भात पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, देवळाली पोलीस चौकीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध असावा. विद्यालय व महाविद्यालय सुट्टीच्यावेळी पोलीस गस्त करावी, शहरातील बाजारतळ व अन्य ठिकाणी असणार्या बेकायदेशीर धंद्यांवर त्वरीत कारवाई करावी. व्यापार्यांची लूट थांबवावी. शहराची शांतता भंग करणार्या गावगुंडांचा बंदोबस्त करावा. आठवडे बाजारात होणार्या चोर्या थांबवाव्यात. यात सुधारणा न झाल्यास नगर-मनमाड महामार्गावर व्यापारी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाळुंज यांनी दिला आहे.

यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी नगरसेवक सचिन ढूस, शैलेंद्र कदम, प्रहारचे अप्पासाहेब ढूस, साईनाथ बर्डे, संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वास पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम, देवराम कडू आदिंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनेचे उपाध्यक्ष युसूफ तांबोळी यांनी व्यापार्यांना संघटनेमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी व्यापारी संघटनेचे सचिव संजय हुडे, अशोक गाडेकर, नरेंद्रकुमार मुथ्था, जालिंदर मुसमाडे, आबासाहेब कदम, अशोक कदम आदिंसह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
