क्रिकेटच्या वादातून आठ जणांची दोघांना जबरी मारहाण वारी येथील घटना; कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठ जणांनी मिळून दोघा खेळाडूंना शिवीगाळ करीत बॅट व स्टंपने तोंडावर, हातापायावर मारहाण करुन जखमी केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया कारखान्याच्या क्रिकेट मैदानावर रविवारी (ता.28) दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
या मारहाणीत खेळाडू अतुल विनायक लोंढे (वय 38) व संगीत विनायक लोंढे (वय 35, दोघे रा.बाभूळगाव खुर्द, ता.येवला, जि.नाशिक) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अतुल विनायक लोंढे यांच्या फिर्यादीवरुन संजय सुभाष जाधव, अभिजीत दीपक जाधव, मंजाहारी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव, नामदेव शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), संदीप सुरेश जाधव, विठ्ठल बाळासाहेब जाधव, जय संजय जाधव (सर्व रा.वारी, ता.कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारी येथे 23 मार्चपासून मच्छिंद्र टेके मित्रमंडळाच्यावतीने विवेकभैय्या कोल्हे चषकाच्या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. रविवारी या चषकातील सामन्याचा अंतिम दिवस होता. या स्पर्धेत मारहाण झालेल्या खेळाडूंचा उपांत्य सामना सुरू होता. यादरम्यान नाशिक क्रिकेट संघाचा खेळाडू अशोक साहेबराव गुंजाळ (रा.येवला, जि.नाशिक) याच्यावर संजय सुभाष जाधव याने संशय घेतला. त्यावर नाशिक संघाचे अतुल लोंढे हे पंचांशी बोलत असतानाच संजय जाधव याने अतुल व त्यांचे भाऊ संगीत लोंढे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या वरील उर्वरित सात जणांनी मैदानाकडे धाव घेत स्टंप व बॅटने मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास मुख्य हवालदार राजेंद्र म्हस्के करीत आहेत.