गोदावरी दुथडी भरुन; मात्र कालवे कोरडेठाक टंचाई टाळण्यासाठी कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे

नायक वृत्तसेवा, राहाता
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेल्या तीन-चार दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने दारणा व गंगापूर ही दोन्ही धरणे भरली. गोदावरी दुथडी भरून वाहू लागली. मात्र, गोदावरी कालव्यांना अद्यापि ओव्हर फ्लोच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. पाणी वाटपासाठीचे निकष ठरविणार्‍या मेंढेगिरी समितीच्या पहिल्या निकषानुसार जायकवाडीत 37 टक्के पाणी असेल तर या कालव्यांतून खरीपासाठी पाणी सोडता येते. मात्र, अद्यापि तरी कालव्यांचे दरवाजे बंद आहेत.

नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पर्जन्यछायेच्या प्रदेशासाठी ब्रिटीशांनी गोदावरी कालवे खोदले. यंदा सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असला तरी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तुलनेत कमी पाऊस आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विहिरी अद्यापि कोरड्या आहेत. उजव्या कालव्यांच्या उत्तरकडे दुष्काळी भाग आहे. तेथील परिस्थिती त्याहून कठीण आहे.

सध्या गोदावरी नदीतून तब्बल साठ हजार क्यूसेक्स पाणी जायकवाडी धरणाकडे निघाले आणि अवघ्या एक हजार क्यूसेक्स वहनक्षमतेच्या गोदावरी कालव्यांच्या दरवाजांना मात्र कुलूप आहे. या धरणाचा साठा पुढील दोन दिवसांत चाळीस टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे मेंढेगिरी समितीच्या निकषाच्या आधारे गोदावरी कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडणे सहज शक्य आहे. कालव्यांच्या लाभक्षेत्रात सर्वदूर पेरण्या झाल्या आहेत. रिमझिम पाऊस पडत असल्याने खरिपाची पिकेदेखील जोमाने वाढत आहेत. मात्र, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल असा पाऊस अद्यापि झाला नाही. गोदावरी कालव्यातून पावसाळ्यात वहाणारे पाणी ओढे-नाल्यात सोडले आणि बंधा-यात साठविले तरच पाण्याची पातळी वाढते. किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आजवरच्या एकूण पावसाची तफावत लक्षात घेता भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी गोदावरी कालव्यातून तातडीने पाणी सोडणे गरजेचे आहे.

Visits: 3 Today: 2 Total: 23097

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *