महाविकास आघाडी सरकारचे संकट काळातही मोठे काम ः थोरात संगमनेरातील वसंत लॉन्स येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना पक्षाला सन्मान मिळून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आले. कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या मोठ्या संकटातूनही शेतकर्यांना दोन लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले असून हे काम राज्यासाठी कायम स्मरणात राहणार असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेरातील वसंत लॉन्स येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, बाजीराव खेमनर, सत्यजीत तांबे, रणजीतसिंह देशमुख, राजेंद्र नागवडे, नगरचे शहराध्यक्ष किरण काळे, करण ससाणे, सचिन गुजर, स्मितल वाबळे, हेमंत ओगले, डॉ. एकनाथ गोंदकर, बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक, डॉ. जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे, लता डांगे, सुनंदा जोर्वेकर, अविनाश दंडवते आदी उपस्थित होते.

1985 पासून तालुक्याच्या विकासाची दिशा बदलली. प्रवरेच्या हक्काच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करून 30 टक्के पाणी मिळवले. याचबरोबर दुष्काळी भागाला वरदान ठरणार्या निळवंडे धरणाच्या कामाला 1999 पासून राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर खर्या अर्थाने गती मिळाली. अनेक अडचणीवर मात करून हे धरण पूर्ण केले. स्व. विलासराव देशमुख यांच्या 2 मिनिटांच्या मीटिंगमधून संगमनेर शहरासाठी अभूतपूर्व व ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना मंजुरीमुळे शहराला आज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. जनतेचे प्रेम आणि काँग्रेस नेतृत्वाचा मोठा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या प्रत्येक मंत्रीपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असे काम केले, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासामुळे देश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व सरळ आहे. त्यांनी अनेकवेळा विश्वास टाकला यातून महाविकास आघाडी सरकारमधून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले असेही माजी मंत्री थोरात म्हणाले. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकेल याकरीता आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी आभार मानले.
