भंडारदर्‍याच्या पाणलोटातील घाटघरमध्ये पडला साडेसहा इंच पाऊस! पावसाचा जोर वाढला; गेल्या चोवीस तासांपासून पाणलोटात पावसाचे धूमशान

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या आठवड्याभरापासून मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटात सक्रीय असलेल्या मान्सूनला गेल्या चोवीस तासांपासून चांगलाच जोर चढला आहे. या हंगामात पहिल्यांदाच पाणलोटातील सर्वच क्षेत्रांनी पावसाची शंभरी ओलांडली असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघरमध्ये चोवीस तासांत साडेसहा इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुळा खोर्‍यातही पावसाचा वेग वाढला असून बुधवारी दुपारी पिंपळगाव खांड प्रकल्प ओसंडल्याने मुळानदी वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या मुळा धरणात आजपासून नवीन पाण्याची आवकही सुरु होणार आहे.

वातावरणातील नाट्यमय घडामोडींनंतर गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांच्या पाणलोटात मान्सूनचे आगमन झाले. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनला सुरुवातीच्या कालावधीत फारसा जोर नसल्याने आदिवासी पट्ट्यासह लाभक्षेत्रातही काहीशी चिंता निर्माण झाली होती. मात्र दरम्यानच्या काळात लाभक्षेत्रात बहुतेक सर्वच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने खोळंबलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु त्यानंतर अपवाद वगळता लाभक्षेत्रातून पाऊस गायब झाला असून सध्या केवळ ढगाळी वातावरणासह दिवसभरात एखाद्यावेळी कोसळणारी आषाढ सर वगळता पावसाने पूर्णतः उघडीप घेतली आहे.

गेल्या शनिवारी मुळा खोर्‍यातील आंबित लघु पाटबंधारे प्रकल्प भरल्यानंतर मुळा नदी वाहती होवून पिंपळगाव खांड प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात होईल असा अंदाज होता. मात्र पावसाला जोरच नसल्याने तो फोल ठरला होता. मात्र सोमवारपासून मुळा खोर्‍यातही पावसाला काहीसा जोर चढल्याने ओढे-नाले खळाळून वाहू लागले, त्याचा परिणाम अवघ्या दोनच दिवसांत दिसून आला. जोरदार कोसळणार्‍या आषाढसरींनी डोंगरकपारीतून पाण्याचे ओहोळ वाहते केल्याने कोतुळनजीकच्या 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आणि बुधवारी (ता.6) माध्यान्नाला या प्रकल्पाच्या भिंतीवरुन पाणी वाहू लागले. सध्या मुळा नदीपात्रातून 1 हजार 700 क्यूसेक पाणी वाहत असून आज सायंकाळपर्यंत हा प्रवाह राहुरीनजीकच्या मुळा धरणात विसवण्याची शक्यता आहे.

उत्तर नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही गेल्या चोवीस तासांपासून पावसाला चांगलाच जोर चढला आहे. अर्थात या भागात सरासरी होणार्‍या पावसाच्या प्रमाणात सध्या सुरु असलेला पाऊस निम्माच आहे, मात्र या पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढवली असून गेल्या चोवीस तासांत भंडारदर्‍यात 266 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. बुधवारी सकाळपासून पाणलोटातील घाटघर, रतनवाडी, पांजरे व भंडारदरा येथे जोरदार आषाढ सरी कोसळल्याने सह्याद्रीच्या कडेकपारीतील असंख्य जलप्रपात कार्यान्वित झाले असून पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरही आषाढ सरींनी फेर धरला आहे. मात्र मुळा व भंडारदरा धरणाच्या तुलनेत तो कमी आहे. गेल्या चोवीस तासांत निळवंडे धरणातही आठ दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने भर पडली आहे. एकीकडे अकोले तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचे धुमशान सुरु होत असताना दुसरीकडे पूर्वेकडील आढळा खोर्‍याला मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या धरणात अद्याप नवीन पाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली नाही.

आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे घाटघर 166 मि.मी, पांजरे 156 मि.मी, रतनवाडी 145 मि.मी, भंडारदरा 135 मि.मी, वाकी 101 मि.मी, निळवंडे 22 मि.मी, आढळा दोन मि.मी, अकोले पाच मि.मी, कोतूळ पाच मि.मी, संगमनेर एक मि.मी, ओझर दोन मि.मी, आश्वी पाच मि.मी, लोणी नऊ मि.मी, श्रीरामपूर 10 मि.मी, मुळा धरण क्षेत्र, शिर्डी व कोपरगाव प्रत्येकी पाच मि.मी व राहुरी तीन मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुळा धरणात 8 हजार 245 दशलक्ष घनफूट, भंडारदरा 3 हजार 273 दशलक्ष घनफूट, निळवंडे 3 हजार 574 दशलक्ष घनफूट व आढळा धरणात 413 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.

Visits: 149 Today: 1 Total: 1591861

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *