अकोले तालुक्यात सर्वत्र सर्पदंशावरील लस उपलब्ध ः डॉ. शेटे सर्पदंश झाल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या पावसाळा सुरू असून सर्वत्र शेतीकामांनी वेग धरलेला आहे. अशातच अकोले तालुक्याच्या आदिवासी भागासह नदीकाठच्या गावांमध्ये सर्पदंशाचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चारही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील लस उपलब्ध करुन दिलेल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे यांनी दिली.

सध्या पावसाळा सुरू असून खरीप हंगामातील कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे तालुक्याच्या आदिवासी भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आरोग्य विभागाने सर्पदंशावरील लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच आवश्यक मनुष्यबळही आदिवासी भागात उपलब्ध आहेत. या लस उपलब्धतेमध्ये राजूरला 35 वायल, अकोले 45 वायल, कोतूळ 90 वायल आणि समशेरपूर येथेही लस उपलब्ध आहेत. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. मात्र, प्राथमिक उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि लस साठा करण्याची सुविधा नसल्याने तेथे लस ठेवता येत नसल्याचेही डॉ. शेटे यांनी स्पष्ट केले.

यामुळे आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी सर्पदंश झाल्यावर तत्काळ उपचारांसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन करत लस उपलब्ध नसल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. याचबरोबर शेती काम करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
