माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनाने निधन! दिल्लीमध्येच होणार अंत्यसंस्कार; हिंदुत्ववादी नेता गमावल्याची नगरकरांमध्ये भावना

नायक वृत्तसेवा, नगर
माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या नियमानुसार दिल्लीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांनी अलीकडेच कोरोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथे दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. गांधी सलग तीनवेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. 1999 मध्ये ते प्रथम खासदार झाले. 2003 ते 2004 या काळात केंद्रातील भाजपच्या सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा चांगला संपर्क होता. त्या माध्यमातून पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यांनी नगरमध्ये आणले होते. नगर शहराच्या राजकारणातही त्यांचा मोलाचा वाटा होता. पक्षाचे ते बराचकाळ शहर जिल्हाध्यक्ष होते. नगरपालिका असताना नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पुढाकारातून सध्या राष्ट्रवादीला सोबत घेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे. खासदार असताना नगर शहरासह मतदारसंघातील ग्रामीण भागातही त्यांनी अनेक योजना राबविल्या. भाजप पक्ष वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अगदी वाड्या-वस्यांवर जाऊन त्यांनी पक्षासाठी काम केले. पहिल्यांदा खासदार झाल्यानंतरच खासदाराचे काय काम असते, हे लोकांना कळाले. त्यांची जनसामान्यांमध्ये मोठी क्रेझ होती. भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक ते थेट खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. पक्षासोबत एकनिष्ठ असतानाही त्यांचे दोनदा तिकिट कापण्यात आलं होतं. एकदा राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख निवडून आले होते. दुसर्यांदा पक्षाने चूक सुधारली आणि गांधी निवडून आले. मागील निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले. इतर पक्षांकडून त्यांना ऑफर होत्या. परंतु त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही.

पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते कोरोनामुळे गमावल्याच्या भावना नगरकरांमध्ये आहेत.

दिलीप गांधी हे नगर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेतील गैरप्रकारासंबंधी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही आरोपींना अटकही झाली आहे. बोगस कर्जवाटप झाल्याचा गुन्हा पुण्यातही दाखल झाला आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष म्हणून गांधी यांचीही चौकशी होणार होती. त्यासंबंधीच त्यांची सध्या धावपळ सुरू होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने भाजपच्या परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली असून, पक्षासाठी शेवटपर्यंत कार्य करत राहणार्या नेतृत्वास पक्ष मुकला असल्याची भावना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत दिलीप गांधी यांनी सातत्याने योगदान दिले. पक्षाच्या पलिकडे जावून विकासात्मक बाबी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांची नेहमीच आग्रही भूमिका होती. सदैव लोकांमध्ये मिसळून पक्षसंघटनेसाठी काम करत राहाण्याचा त्यांचा गुण कार्यकर्त्यांना प्रेरणादायी राहिल्याचे विखे पाटील म्हणाले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करताना या भागातील प्रश्नांसाठीही त्यांचा पाठपुरावा राहिला. डॉ.सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांची सक्रीयता ही सदैव आठवणीत राहिल. जनसामान्यांची नाळ जोडलेला कार्यकर्ता दिलीप गांधी यांच्यामध्ये सर्वांनाच पाहायला मिळाला अशा शब्दांत विखे पाटील यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
