शहराचे वैभव वाढवणार्‍या दुर्वेनाना व्यापारी संकुलाला लागली शेवटची घरघर! नगर पालिकेने तीन दिवसांत संकुल खाली करण्याच्या नोटीसा बजावल्याने गाळेधारकांत हडकंप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या वैभवाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या आणि सतत वादग्रस्त बांधकाम म्हणून चर्चेत राहीलेल्या नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे व्यापारी संकुलाला शेवटची घरघर लागली आहे. या इमारतीचा ‘धोकादायक’ वास्तुंमध्ये समावेश झाल्याने संगमनेर नगर पालिकेने या इमारतीतल्या सर्व भोगवटाधारकांना तीन दिवसांच्या नोटीसा बजावतांना तात्काळ गाळे खाली करण्याचे फर्मान धाडले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे लाखों रुपये देवून पोटभाडेकरी झालेल्यांसह मूळ भोगावटाधारकांचे धाबे दाणाणले आहेत. सदरची इमारत पुर्णतः जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे संगमनेरच्या वैभवाचा शुभारंभ करणारी ही इमारत आता इतिहास जमा होणार आहे.


गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार पुण्यातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरातील पालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींसह अन्य शासकीय इमारतींचेही ऑडिट करण्यात आले. त्यातून नवीन रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वेनाना व्यापारी संकुल धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता व तसा अहवाल व त्यावरील कारवाईबाबतच्या सूचनाही नगर पालिकेच्या प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.


पालिकेने शासकीय अहवालाचा सन्मान म्हणून त्याचवेळी म्हणजे 11 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांतंर्गत नवीन नगर रस्त्यावरील दुर्वेनाना व्यापारी संकुलात असणार्‍या सर्व भोगवटादारांना गाळे खाली करण्याच्या नोटीसा बजावून आपले कर्तव्यही पूर्ण केले होते. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने नेहमीप्रमाणे मिळालेला कागद म्हणून बहुतेक गाळेधारकांनी एकतर त्याला केराची टोपली दाखवली, नाहीतर कागदाच्या गठ्ठ्यात आणखी म्हणत दुकानातली रद्दी वाढवली. मात्र आता शासनाकडून त्याबाबत कारवाईचा अहवाल मागवण्यात आल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने नोटीसा काढण्यात आल्या आहेत.


पालिकेने दोन मजली बांधकाम असलेल्या दुर्वेनाना व्यापारी संकुलातील सर्व भोगवटादारांना पुन्हा एकदा नोटीसा बजावतांना नगरपालिका अधिनियम 1965 मधील कलम 195 व 299 चा आधार घेत नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आंत संकुलातील सर्व गाळे खाली करण्याचे फार्मान धाडले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देतांनाच सदरची इमारत धोकादायक वास्तु म्हणून जाहीर झाल्याचे व त्यामुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाल्याचे म्हंटले आहे. नोटीस बजावल्यानंतरही गाळे खाली न केल्यास व त्यानंतर नैसर्गिक संकटात सदरची इमारत कोसळून जीवित अथवा वित्तीय नुकसान झाल्यास त्याची जबाबदारीही भोगवटादारांवर लोटण्यात आली आहे.


तीन दशकांपूर्वी संगमनेरकरांना नवीन नगर रस्त्याचा भाग भितीदायक वाटत होता. सूर्यास्तानंतर गावठाणभागातील नागरिक ओघानेच या परिसरात येत. समोरील बाजूला बसस्थानक होते, मात्र सूर्यास्तानंतर अभावानेच एखाद दुसर्‍या बसेस सुटत असल्याने या परिसरात प्रवाशांचीही जेमतेम गर्दी असायची. मात्र शहराच्या विस्तारासाठी हाच भाग महत्त्वाचा असल्याने पालिकेने नागरिकांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्यासाठी शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करीत चक्क स्वतःच अतिक्रमण केले व लेंडीनाल्याच्या प्रवाहावरच दोनभागातील दोन मजली व्यापारी संकुल उभे केले. या बेकायदा संकुलाचे नामकरणही ‘साथी भास्करराव दुर्वे’ ठेवण्यात आले. गेल्या तीन दशकांत संगमनेरकरांच्या मनातील भिती दूर करण्यासोबतच या संपूर्ण परिसराच्या वैभवाचा साक्षीदार ठरलेल्या या संकुलाला आता शेवटची घरघर लागली आहे.


या व्यापारी संकुलात सुरुवातीला नाममात्र डिपॉझिट देवून भोगावटादार झालेल्या बहुतेकांनी नंतरच्या काळात लाखों रुपये घेवून औषधालये व अन्य व्यावसायिकांना पोट भाडेकरी म्हणून सदरचे गाळे चालवण्यास दिले. या संकुलाच्या माध्यमातून नवीन नगर रस्त्याला वैभव प्राप्त झाले होते. आता त्यालाच घरघर लागल्याने संगमनेरच्या वैभवाचा खर्‍याअर्थी मूकसाक्षीदार ठरलेली ही इमारत आता जमीनदोस्त होणार आहे. अर्थात पालिकेच्या कथनी आणि करणीत अनेकदा समन्वयाचा अभाव दिसून आल्याने या नोटीसा खर्‍या की खोट्या यासाठी काही दिवसांची प्रतिक्षा करावीच लागणार आहे.

महामार्ग प्राधिकरणासह अनेक जागृक संगमनेरकरांनी या व्यापारी संकुलाकडे बेकायदेशीर म्हणून बोट दाखवले आहे. नैसर्गिक प्रवाह असलेल्या लेंडी या शहरातील मोठ्या नाल्याचे पात्र संकुचित करुन त्यावर हे संकुल बांधले गेले. त्यामुळे यापूर्वी अनेकदा मुसळधार पावसात हा नाला तुंबून होवून नवीन रस्त्यासह बसस्थानकाच्या समोरील भागात गुडघाभर पाणी साचते, अनेकदा ते दुकानात शिरल्याने या रस्त्यावरील बहुतेक व्यापार्‍यांनी एकदा का होईना नुकसान सहन केले आहे. आता हे संकुल नामशेष होणार असल्याने या रस्त्यावरील ही समस्याही सुटण्यास मदत होईल असा काहींचा अंदाज आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 116268

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *