पाचेगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने चिंताग्रस्त पीक उगविण्यासाठी तुषार सिंचनाचा करताहेत वापर

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पाचेगाव परिसरात जवळपास सर्व शेतकर्‍यांच्या खरीपातील पेरण्या झाल्या आहेत. परंतु, आता पावसाचा या भागात मोठा खंड पडला असून लागवडी झालेल्या कपाशी व पेरणी केलेल्या सोयाबीन आता पाण्यावर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे आता तुषार सिंचनाचा वापर करून शेतकरी पीक उगवून वर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहेत.


पाचेगाव परिसरात या पावसाळ्यात आत्तापर्यंत जवळपास 123 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. याच पावसाच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी पेरण्या करून घेतल्या, पण आता पावसात खंड पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीन व कपाशीची पिके पाण्यावर आली आहेत. पिकांची पाण्याची भूक वाढली असून शेतकर्‍यांना आपली पिके वाचविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे.

सोयाबीन व कपाशी पिकांची लागवड होऊन परिसरातील क्षेत्र व्यापून गेले आहे. सुरुवातीला म्हणजे जूनच्या शेवटच्या टप्प्यात पाचेगाव परिसरात पेरणी योग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांनी याच ओलीवर आपल्या पेरण्या करून घेण्याची घाई केली. मात्र आता तर पाऊस या भागात पडायला तयार नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जवळपास सर्व क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आणि पाऊस लांबल्याने सर्वच पिके पाण्यावर आली. कोणत्या पिकांना पाणी द्यावे हाही प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. एकतर महागाईने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. सोयाबीन बियाणे, कपाशी, मका, रासायनिक खते, तणनाशक औषधे, कीटकनाशके औषधे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या सर्व अडचणींवर मात करीत शेतकर्‍यांनी खरीपातील पिकांची पेरणी व लागवडी केल्या, पण आता पाऊस उघडल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केलेली कोवळी पिके आता पाण्यावर आली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Visits: 10 Today: 1 Total: 118981

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *