आधी कांद्याने रडवलं आणि आता अवकाळीने फसवलं! शेतकर्यांची अवस्था बिकट; संगमनेर तालुक्यात ऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पडक्या बाजारभावाने आधीच मेटाकुटीला आलेल्या बळीराजावर गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणार्या अस्मानी संकटाने रडण्याची वेळ आली आहे. ऐन होळीच्या दिवशी तालुक्यात सर्वदूर झालेल्या वादळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतकर्यांनी सोंगून ठेवलेल्या गव्हासह हरबरा, टोमॅटो, कांदा, भाजीपाला व फळबागा बाधित झाल्या असून प्राथमिक माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील सहा गावांना याचा फटका बसला आहे. तालुक्यात 70 हेक्टरवरील टोमॅटोसह दहा हेक्टरहून अधिक द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यात वाढ होण्याची भीती आहे. वादळाने उन्मळून पडलेल्या विजेच्या खांबावरील विद्युतवाहिनीचा धक्का लागून घुलेवाडीतील दूध उत्पादकाची तीन जनावरेही दगावल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आधी कांद्याने रडवले आणि आता अवकाळीने फसवल्यागत शेतकर्याची अवस्था झाली आहे.

सोमवारी सायंकाळनंतर सुरु झालेल्या पावसाने राज्यासह संपूर्ण संगमनेर तालुक्यात वादळासह हजेरी लावली. सुरुवातीला सोसाट्याच्या वार्यासह उठलेल्या वावटळाने वातावरण गंभीर केले तर, त्यानंतर विजांच्या कडकडाटासह सुरु झालेल्या मुसळधार पावसाने ऐन होळीच्या दिवशी बळीराजाच्या डोळ्यातून आसवं काढली. संगमनेर तालुक्यातील बहुतेक भाग दुष्काळी आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजांचे संपूर्ण अर्थकारण खरीप आणि रब्बीच्या पिकांवरच अवलंबून आहे. गेल्या हंगामात तालुक्यात उशिरापर्यंत पाऊस सुरु झाल्याने व त्यानंतर परतीच्या पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः धुवून काढल्याने शेतीचे मोठे झाले होते. त्यावेळी झालेल्या प्रचंड नुकसानीतून सावरण्यापूर्वीच एकामागून एक संकटे कोसळल्याने बळीराजा अक्षरशः कोलमडला आहे.

काल-परवापर्यंत कांद्यासह भाजीपाल्याला भाव नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी कांदा, कोबी यासारख्या पिकांवर अक्षरशः रोटाव्हेटर फिरवला तर काहींनी उभ्या पिकांमध्ये शेळ्या-मेंढ्या सोडल्या. तर बहुतेक भागात शेतातील गहू, हरबरा काढण्याचीही लगबग दिसून येत होती. तालुक्यातील अनेक भागात शेतकर्यांनी गव्हाच्या पेंढ्या करुन शेतातच ठेवल्या होत्या तर काही भागात गहू सोंगणीच्या कामाला वेग आल्याचेही दिसत होते. त्यातच अवकाळीने हजेरी लावल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गेल्या दोन दिवसांत आणि त्यातही सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने तालुक्यात हाहाकार केला असून रब्बी पिकांसह डाळींब, द्राक्ष बागा व भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान केले आहे.

महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे पाच गावे बाधित झाली असून या गावांमधील अंदाजे 70 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील टोमॅटो आणि दहा हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय वादळी वार्यामुळे तालुक्यातील अनेक भागात वीजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे विद्युतवाहक तारा जमिनीवर आल्याने घुलेवाडीत अशाच विद्युतवाहिनीचा धक्का लागून लक्ष्मण आव्हाड या दूध उत्पादकाची एक कालवड आणि दोन दुभती जनावरेही दगावली आहेत.

सोमवारी रात्री झालेल्या या वादळी पावसाचा सर्वाधीक फटका तालुक्याच्या प्रवरा खोर्यासह पठारभागाला बसला आहे. अकोले तालुक्यातही मुळा, प्रवरा व आढळा खोर्यात मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह काही भागात गारपीटही झाल्याने शेतकर्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे येणार्या काळात वेगवेगळ्या रोगांचाही प्रादुर्भाव होणार असल्याने राज्यातील बळीराजावर एकामागून एक अस्मानी संकट कोसळण्याची श्रृंखला कायम असल्याचे चित्र निर्माण झाले असून शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्यांना सन्मानजनक दिलासा देण्याची मागणी होत आहे.

हवामानाचे भाष्यकार पंजाबराव डख यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार 6 ते 8 मार्च या कालावधीत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस व गारपीट, तर 9 ते 13 मार्च या कालावधीत उघडीप मिळणार आहे. त्यानंतर आठवडाभर पुन्हा ढगाळ वातावरण तयार होवून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आवश्यक ती काळजी घेवून काढून ठेवलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

