ओमिक्रॉनबाधित महिला उपचारांनंतर सुखरुप घरी परतली! पुढील सात दिवस गृह विलगीकरणात ठेवणार; तहसीलदारांची माहिती
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नायजेरिया येथून श्रीरामपूरात आलेल्या ओमिक्रॉन पॉझिटिव्ह महिलेचा उपचारानंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने महिलेसह तिच्या मुलाला नुकतेच सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले, असून रविवारी (ता.26) त्यांची पुन्हा ओमिक्रॉनची तपासणी केली. त्यात सदर महिलेसह सहावर्षीय मुलाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.
ओमिक्रॉन पॉझिटिव्ह महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांनी देखील कोरोना लसीकरण केलेले होते. त्यामुळे उपचार घेवून त्या लवकर बर्या झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वॉरंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. नोकरीनिमित्त नायजेरिया (वेस्ट आफ्रिका) येथे गेलेल्या महिलेसह त्यांचा सहा वर्षांचा मुलगा 15 डिसेंबर रोजी श्रीरामपूरात आले होते. त्यानंतर 18 डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने त्यांची कोरोना तपासणी केली. त्यात महिला आणि दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले.
त्यामुळे ओमिक्रॉन तपासणीसाठी त्यांच्या स्रावाचे नमुने तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील सुमारे 55 नागरीकांचा शोध घेवून सर्वांची कोरोना तपासणी केली. सुदैवाने त्यातील सर्वांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. परंतु शुक्रवारी (ता.24) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिलेचा ओमिक्रॉनचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. अहमदनगर जिल्ह्यात अखेर ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याना जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
प्रशासनाला सहकार्य करा!
कोरोनासह ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणासह घराबाहेर पडताना मास्क वापरणे गरजेचे आहे. नागरीकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले, नसलेल्या नागरिकांनी तत्काळ लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे, आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री देशमुख यांनी केले आहे.