बारा ठाण्यांचे पोलीस शोधत असलेले आरोपी संगमनेरात जेरबंद! पोलीस अधीक्षकांची पत्रकारांना माहिती; पाच जिल्ह्यातून चोरलेल्या 51 दुचाकीही जप्त..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यात नवनवीन गुन्हेगारांचा समावेश होत असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड बनले आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा कारवाया करीत आरोपी गजाआड केले आहेत, मात्र त्यातून अशा प्रकारच्या घटनांना पूर्णतः आळा बसलेला नाही. अशातच आता पाच जिल्ह्यातील तब्बल बारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अक्षरशः धुमाकूळ घालणार्या मोटारसायकल चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत 26 लाख मूल्याच्या 51 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांना दिली. संगमनेर शहर पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई ऐतिहासिक असल्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना प्राधान्याने तपासाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाभर अशाप्रकारची कारवाई सुरु असून संगमनेर पोलिसांनी मात्र धडाकेबाज कारवाई करताना इतिहास रचला आहे. शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या घटनांचे सीसीटीव्ही विश्लेषण करुन सुरुवातीला पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याने अन्य दोघांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी जंग जंग पछाडीत पसार झालेल्या ‘त्या’ दोघांनाही मोठ्या शिताफीने अटक केली.
गेल्या आठ दिवसांपासून त्या दोघांनाही पोलीस कोठडीत घेवून त्यांनी चोरलेल्या मोटारसायकलची माहिती मिळवताना पोलिसांनाही धक्का बसल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले. अल्पवयीन मुलासह या तिघाही आरोपींनी केवळ संगमनेर अथवा अहमदनगर जिल्हाच नाही तर, नाशिक, पुणे, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरसह मध्य प्रदेशमधील सेंधवा येथूनही वेगवेगळ्या दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संगमनेर पोलिसांनी अक्षय सावन तामचीकर (वय 18) व सूरजीत दिलीपसिंग तामचीकर (वय 22, दोघेही रा.भाटनगर, घुलेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून आत्तापर्यंत 51 मोटारसायकली हस्तगत केल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या दोघांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 18 मोटारसायकल लांबविल्या असून जिल्ह्यातून 27 दुचाकी चोरल्या आहेत.
याशिवाय सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 22, ओझर व सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन, सातपूर औद्योगिक वसाहतीतून एक, पुणे जिल्ह्यातील मंचर आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधून दोन आणि चक्क मध्य प्रदेशातील सेंधवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही त्यांनी एक मोटारसायकल चोरुन आणली आहे.
आत्तापर्यंतच्या चौकशीत त्यांच्याकडून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास केलेल्या 18, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक, राजूर, श्रीरामपूर, कोपरागव, शिर्डी व नेवासा येथून चोरलेली प्रत्येकी एक व अद्यापपर्यंत माहिती समोर न आलेल्या सहा अशा एकूण 51 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. अजूनही त्यांच्याकडून बर्याच घटनांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविताना पोलीस अधीक्षकांनी मोटारसायकल हस्तगत करण्याची संख्या आणखी वाढणार असल्याचेही पत्रकारांना सांगितले.
एखाद्या पोलीस ठाण्याच्या तपासात एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची ही घटना विरळ असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासी पथकातील प्रभारी उपअधीक्षक संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांचे भरभरुन कौतुकही केले.
गेल्या मोठ्या कालावधीपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात निष्क्रीय पोलीस निरीक्षकांची वर्णी लागत गेल्याने शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होण्यासह दाखल प्रकरणांचे तपासही ठप्प झाले होते. त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. मात्र गेल्या महिन्यात शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी धडाकेबाज सुरुवात करीत आपल्या पथकाकरवी ऐतिहासिक कामगिरी केल्याने शहरातून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.