सूर्यवंशीची निम्मी टोळी झाली गजाआड! खुनाच्या प्रयत्नात होते पसार; आता दरोड्याच्या तयारीत अडकले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला कामावरुन घरी पतरणार्‍या तरुणाचा खून करण्याच्या हेतूने मारहाण करीत त्याला लुटणार्‍या साई सूर्यवंशी टोळीने अवघ्या चारच दिवसांत पुणे-नाशिक महामार्गावर दरोड्याचा बेत आखला. त्यासाठी जून्या महामार्गावरील अंधारलेल्या हरिबाबा मंदिर परिसराची निवडही करण्यात आली. ठरल्याप्रमाणे दोन दोनचाकींवरुन एअरगन, हातोडे, कटावण्या, कोयते अशी शस्त्र घेवून या परिसरात जमलेल्या टोळीकडून सावज हेरण्याची तयारी सुरु असतानाच शहर पोलिसांच्या गस्तीपथकाला त्याची कुणकूण लागली आणि त्यांच्याच मेहबानीने गुन्हेगारीचा भस्मासूर झालेल्या साई सूर्यवंशी टोळीतील खुनाच्या प्रयत्नात पसार असलेल्या दोघांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या धांदलीचा फायदा घेत टोळीचा सूत्रधार साई सूर्यवंशी मात्र तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने फाटलेली काही लक्तरे पूर्ववत झाली असली तरीही मुख्य आरोपी अद्यापही गायबच असल्याने साशंकता कायम आहे. पकडलेल्या चौघांकडून दोन दुचाकी, चार मोबाईलसह एक लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या सर्वांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा थरार गुरुवारी पहाटेच्या सुमारास जून्या कर्‍हेे घाटालगतच्या हरिबाबा मंदिर परिसरात घडला. नेहमीप्रमाणे शहर पोलीस ठाण्याच्या वाहनातून शहर हद्दित रात्रीची गस्त सुरु असताना कर्तव्यावरील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांना हरिबाबा मंदिराजवळ दोन दुचाकींवर आलेल्या इसमांकडून महामार्गावर वाटमारी सुरु असल्याची माहिती समजली. त्यांनी तात्काळ आपल्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सातपुते, कॉन्स्टेबल राम मुकरे, आगलावे, कोंदे, हरिश्‍चंद्र बांडे, आत्माराम पवार यांच्यासह घटनास्थळावर धाव घेतली.


पोलिसांचे वाहन आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून पाचही दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता डोंगरवाटांना त्यांचा पाठलाग करीत त्यातील चौघांच्या मुसक्या आवळल्या तर, एकजण मात्र जीवावर उदार होत तेथून पसार होण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांच्याही अंगझडतीतून दरोड्यासाठी लागणार्‍या साहित्यासह लोखंडी गज, कटावणी, हातोडा, नायलॉन दोरी, स्क्रू-ड्रायव्हर, अनेक दुचाकींच्या चाव्या आणि मिरची पावडर आढळली. त्यासोबतच पोलिसांनी धाक दाखवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या एअरगनही ताब्यात घेतल्या. आरोपींच्या ताब्यातील ज्युपिटर कंपनीची मोपेड (क्र.एम.एच.17/सी.एल.7659) व होंडा पॅशन-प्रो (क्र.एम.एच.16/बी.जे.8292) आणि चार मोबाईलही जप्त केले आहेत.


पकडलेल्या चौघांना बेड्या ठोकल्यानंतर त्यांची ओळख विचारली असता गेल्या आठवड्यात साईनगरजवळील छोट्या पुलावर लुटमार करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या साई सूर्यवंशी टोळीतील अनिकेत गजानन मंडलिक (वय 23, रा.माळीवाडा), आदित्य संजय शिंदे (वय 19, रा.अकोलेनाका) या दोघा फरार आरोपींसह सराईत गुन्हेगार निखिल विजय वाल्हेकर (वय 24, रा.वेल्हाळे) व मोहन विजय खरात (वय 19, रा.घुलेवाडी) हे चौघे पोलिसांच्या हाती लागल्याचे समोर आले तर, पसार झालेला आरोपी दुसरा कोणी नसून या टोळीचा म्होरक्या साई शरद सूर्यवंशी असल्याचेही स्पष्ट झाले.


या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी वरील पाचही जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 310 (4), (5) सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 25/3 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या चौघाही आरोपींना सोमवारपर्यंत (ता.27) पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने केलेल्या कारवाईत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राजरोसपणे धुडगूस घालूनही पोलिसांच्या हातावर तुर्‍या ठेवणार्‍या टोळीतील निम्मे आरोपी हाती लागल्याने ऐन दिवाळीत पोलिसांची फाटलेली लक्तरे काही प्रमाणात सावरली आहेत.


गेल्याच आठवड्यात साई सूर्यवंशी टोळीने ड्रग्जसाठी पैसे मिळावेत या कारणाने घोडेकरमळा परिसरात राहणार्‍या व कापड दुकानात काम करुन उदरनिर्वाह करणार्‍या तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत त्याच्याकडील पाच हजार रुपयांची रोकडही काढून घेण्यात आली होती. प्रचंड लोकवस्तीच्या प्रवेशद्वारातच घडलेल्या या घटनेत एका महिलेने हिम्मत दाखवून मध्यस्थी केल्याने ‘त्या’ तरुणाचा जीव वाचला, मात्र इतक्या भयंकर घटनेनंतरही पोलिसांना साई सूर्यवंशी टोळीचा मागमूस लावता आलेला नव्हता, त्यावरुन ऐन दिवाळीत संगमनेरकरांमध्ये पोलिसांच्या निष्क्रियतेबाबतचा रोष खद्खद्त होता, गस्तीपथकाच्या धडाकेबाज कारवाईने तो काहीअंशी शमण्याची शक्यता आहे.

Visits: 427 Today: 2 Total: 1421434

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *