‘खोटे बोला पण रेटून बोला’ हे काँग्रेसचे विकास मॉडेल : जहागिरदार छत्रपतींच्या स्मारकाची जागा आढळून येत नाही; पालिकेकडून मिळालेल्या माहितीवरुन पुन्हा घणाघात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमा असलेल्या स्मारकावरुन सुरु झालेली राजकीय फेकाफेक आजही कायम आहे. या विषयाला फोडणी देतांना भाजपाने पालिकेची सत्ता दिल्यास एक एकराच्या परिसरात शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर देतांना सत्ताधारी काँग्रसने भाजपा जनतेला भूलथापा देत असल्याचे सांगत स्मारकाची संकल्पना आपलीच असून त्यासाठी दोन वर्षांपूर्वीच तब्बल 50 लाखांची भरीव तरतूद केल्याचे सांगितले होते. आता भाजपाने माहिती अधिकारात मिळालेला मुद्दा पुढे करुन पुन्हा एकदा सत्ताधारी काँग्रेसला चुचकारले असून ‘खोटं कोण बोलतंय शहराध्यक्ष, एकदा स्क्रिप्ट लिहिणार्‍यांना विचारा’ असा उपरोधीक सवाल भाजपाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी विचारला आहे.

आगामी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले व सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी काँग्रसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केल्याचा घणाघात करतांना संगमनेरकरांनी भाजपाच्या हाती सत्ता दिल्यास शहरात एक एकरच्या प्रशस्त जागेत छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ प्रतिमेसह सुंदर स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्याला उत्तर देतांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी विरोधकांना केवळ निवडणूका जवळ आल्या की शिवरायांची आठवण होत असल्याची टीका करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेसह त्यांना साजेशा स्मारकाची संकल्पना काँग्रेसचीच असल्याचे सांगत त्यासाठी सन 2020-2021 च्या पालिका अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केल्याचे सांगितले होते.

काँग्रेस शहराध्यक्षांच्या या प्रत्युत्तरानंतर जहागिरदार यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन छत्रपतींच्या स्मारकाबाबत पालिकेकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधारी काँग्रेसला आव्हान दिले असून ‘पालिकेतील सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहात?’ असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे. याबाबत माध्यमांना त्यांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये पालिकेकडून शिवस्मारकाबाबत प्राप्त झालेल्या अर्थसंकल्पीय तरतूदींसह ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी संगमनेर शहर विकास योजनेत जागा आरक्षित केलेबाबतची माहिती आढळून येत नाही.’ अशा आशयाचे पालिकेचे पत्रही दिले आहे.

यावर अधिक प्रकाश टाकताना जहागिरदार यांनी म्हंटले आहे की, ‘भाजप म्हणजे खोटं बोलं पण, रेटून बोलं’ या तत्त्वावर काम करणारा पक्ष असल्याचे विधान काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केले होते. प्रत्यक्षात काँग्रेसचे शहराध्यक्ष बालीश असून त्यांनी यशोधनवरुन येणारी स्क्रिप्ट एकदातरी वाचून बघितली पाहिजे अशी घणाघाती टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्त्वाखाली काम करतांना भाजपाचे शहर आणि तालुक्यात प्राबल्य वाढत आहे. त्यामुळे स्थानिक सत्ताधारी अस्वस्थ झाले असून तीन दशकांपासून पालिकेत सत्ता भोगूनही ज्यांना शिवस्मारकाबाबत खोट्या तरतूदी वगळता काही एक करता आले नाही ते आज भाजपाला खोटं ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे सांगतिले आहे.

नगरपालिकेतील सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी किती खोटं बोलताहेत हे स्पष्ट करीत त्यांनी दिवटे यांनी 50 लाख रुपयांच्या तरतूदीबाबत केलेला दावा सपशेल खोटा आणि जनतेची फसवणूक करणारा असल्याचे सांगितले. पालिकेकडून आपणास प्राप्त झालेल्या माहितीत शिवस्मारकासाठी कोणतीही जागा आढळून येत नसल्याचे स्पष्ट झालेले असतांना 50 लाखांच्या निधीची घोषणा फसवी नाही तर काय आहे? असा उलट सवाल त्यांनी विचारला आहे. यावर अधिक भाष्य करतांना जहागिरदार यांनी सत्ताधार्‍यांनी सन 2020-2021 च्या अर्थसंकल्पात 50 लाखांची तरतूद केल्याचे अंदाजपत्रकात दाखवले, तर त्यानंतर सन 2021-22 व सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात मात्र हिच तरतूद 25 लाख रुपयांची दाखवण्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सन 2021-22 मध्ये जर 50 लाखांची तरतूद केली होती तर न खर्च होता ती पुढील दोन वर्षात 25 लाखांवर कशी आली असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना गृहपाठ करण्याचा सल्लाही दिला आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात दरवर्षी अशा असंख्य बनावट नोंदी होत असतात, प्रत्यक्षात त्या येतीलच अशी कोणतीही शाश्वती नसतांना काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी शिवस्मारकाबाबत केलेले विधान धादांत खोटे असल्याची टीकाही जहागिरदार यांनी केली आहे. यशोधनमधून येणारी स्क्रिप्ट एकदातरी वाचून बघत जा, असा उपरोधीत सल्ला देताना त्यांनी आता संगमनेरकर जनता तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. तुमचे विकासाचे मॉडेल म्हणजे भूमाफिया, टेंडरमाफिया, वाळू माफिया, निकृष्ट कामे, जास्त दराच्या निविदा, घरपट्टीतील प्रचंड वाढ, आरोग्य सुविधांची वाणवा, अस्ताव्यस्त भाजीबाजार, फिल्टर प्लँट असूनही अशुद्ध पाण्याचा पुरवठा हेच असल्याचे सांगत 30 वर्षांत छत्रपतींच्या स्मारकासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ हे काँग्रेसचे विकास मॉडेल असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला कौल मिळाल्यास 30 वर्षांचा विकास पाच वर्षांत करुन दाखविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 116281

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *