मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा!

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा!
जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसह संलग्नित कक्षाची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग स्थापना कायदा 2006 व एम. जी. गायकवाड राज्य मागास वर्ग आयोग अहवाल 2018 या संदर्भासह मराठा समाजाचा आता सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, पोलीस भरतीमध्ये मराठा तरुण-तरुणींची 13% जागांवर सरसकट भरती करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, सर्व संलग्नित कक्ष संगमनेर तालुका यांच्यावतीने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नायब तहसीलदार सुभाष कदम यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज हा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करीत राहिला आहे. लाखोचे मराठा क्रांती मोर्चा निघाल्यावर अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने 2020-21 या कालावधीकरिता मराठा आरक्षणात उच्च शिक्षणात स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उमटू लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयावर मराठा सेवा संघाची भूमिका नेहमीच संविधानिक राहिली आहे. 1902 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी एकूण साडेतीनशे जातींना आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजासहित बहुजन समाज समाविष्ट होता. कालांतराने मराठा समाजाला ओबीसीमधून बाहेर काढण्यात आले.


या सर्व प्रक्रियेदरम्यान मराठा आरक्षण हा विषय फक्त राजकारण्यांनी सोयीसाठी वापरला. याची फलश्रुती म्हणजे उच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड मागास वर्ग आयोगाचे गठन केले, सर्व तपासणी करून अहवालातून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. मराठा समाज राज्यघटना कलम 340 मधील आरक्षणास पात्र ठरत आहे, अशी शिफारस न्यायमूर्ती गायकवाड यांनी आपल्या अहवालातून केली असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले आहे.


सदर निवेदन देतेवेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉ.दीपाली पानसरे, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा डॉ.श्रद्धा वाणी, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मंजाबापू गुंजाळ, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय उगले, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा सुवर्णा खताळ, तालुका उपाध्यक्षा माधुरी शेवाळे, तालुका सचिव स्नेहलता कडलग, काँग्रेस सरचिटणीस निर्मला गुंजाळ, गुंजाळवाडीच्या सरपंच वंदना गुंजाळ, अकोले तालुका अध्यक्षा उज्ज्वला देशमुख, श्रद्धा देशमुख आदिंसह सर्व समकक्ष कक्षांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Visits: 4 Today: 1 Total: 29276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *