नेवासा आगाराने वारकर्यांसाठी तत्पर सेवा द्यावी ः हभप. काटे आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर बससेवेचा नेवाशातून शुभारंभ

नायक वृत्तसेवा, नेवासा
आषाढी एकादशीनिमित्ताने तसेच पंढरपूर येथील देवगड संस्थानच्या मठात होणार्या नामदेव गाथा पारायण व भागवत कथेच्या निमित्ताने पंढरपूर बससेवेचा शनिवारी (ता.2) नेवासा येथून शुभारंभ करण्यात आला. वारकर्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी नेवासा बस आगाराने पंढरपूरला जाणार्या वारकर्यांसाठी तत्पर सेवा द्यावी, असे आवाहन जय हरी आश्रमाचे प्रमुख कडूभाऊ महाराज काटे यांनी शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
![]()
बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी काटे महाराज यांच्या हस्ते बसचे पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके यांनी आलेल्या वारकर्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बससेवा देणारे चालक दत्तात्रय वाघ व वाहक रामभाऊ कराळे यांचाही सन्मान करण्यात आला. वारकर्यांचे प्रतिनिधी म्हणून संतसेवक सोमनाथ वाखुरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रवासी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण म्हणाले, आषाढी एकादशीनिमित्ताने देवगड संस्थानच्या पंढरपूर येथे असलेल्या मठामध्ये 4 ते 11 जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने नामदेव गाथा पारायण व श्रीमद्भागवत कथेचे आयोजन भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. येथील सोहळयाचा लाभ सर्व भाविकांना घेता यावा म्हणून केलेल्या मागणीनुसार नेवासा आगाराने बससेवा उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांनी आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव यांना धन्यवाद देत आभार मानले. यावेळी वाहतूक नियंत्रक रतन हारकळ, संतसेवक सोमनाथ वाखुरे, शंकर मैंदाड, मुकेश गोयर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.
