हरित वसुंधरा हा उपक्रम जगासाठी पथदर्शी ठरावा : आमदार थोरात उद्योजक मनीष मालपाणी यांचा वाढदिवस; कारेश्‍वर टेकडीवर वृक्षारोपण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विहिरीतलं पाणी संपलं की आपल्याला पाण्याचे महत्त्वं समजते, वीज गेल्यानंतर वीजेचे महत्त्व समजते. प्रकृतीने आपल्याला अशाकाही गोष्टी दिल्या आहेत की ज्या नसल्या की त्याचे महत्त्व आपल्याला समजते. जागतिक तापमानवाढीच्या कारणाने आज आपल्याला झाडांचे महत्त्व समजायला लागले आहे. दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून आपण पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करीत असताना उद्योजक मनीष मालपाणी यांनी हरित वसुंधरेचे स्वप्न मनात बाळगून दरवर्षीच्या वाढदिवसाला एखादी ओसाड टेकडी हरित करण्याचा त्यांचा संकल्प भविष्यात जगासाठी पथदर्शी ठरेल असे गौरोद्गार माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढलेे.


संगमनेरचे उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसा निमित्ताने धांदरफळ शिवारातील कारेश्‍वर टेकडीवर 51 हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, श्रीमती सुवर्णा मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकवीरा फाऊंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह डॉ.संजय, गिरीश व आशिष मालपाणी, रचना मालपाणी, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदारे, सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील, रामहरी कातोरे, सरपंच उज्ज्वला देशमाने, स्वदेश सेवाभावी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब देशमाने आदी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच केरळमधील वायनाडमध्ये पावसामुळे उडालेला हाहाकार आपण सर्वांनी बघितला. खरेतर पश्‍चिमघाट पर्यावरण समितीने आपल्या अहवालात या सगळ्या गोष्टींकडे शासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधले होते. मात्र आपण त्याकडे गांभीर्याने बघितले नाही, त्याचा परिणाम माळीण, तळई सारख्या दुर्घटनांचा आपल्याला सामना करावा लागला. निसर्ग आपल्याला सावरण्याची संधी देतो, मात्र ती डावलून जेव्हा आपण त्याला उध्वस्थ करण्याचे काम करतो तेव्हा काय घडते हेच या घटनांमधून दिसून आल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.


माजी आमदार डॉ. तांबे यांनी वृक्षारोपण ही पर्यावरण संवर्धनाची चळवळ असून वृक्षवल्ली आणि सजीवाला वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी होण्याची आवश्यकता व्यक्त केली. संगमनेर तालुक्याचा एक तृतीयांश भाग डोंगराळ असून प्रत्येकाने अशा टेकड्यांचा शोध घेवून तीथे झाडे लावली आणि ती वाढवली तर आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


उद्योजक मनीष मालपाणी यांनी दोन दशकांपूर्वी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानात मालपाणी उद्योग समूहाने खांडेश्‍वर डोंगरांवर केलेल्या बीजरोपणाच्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हापासून दरवर्षीच्या वाढदिवसाला दोनशे-तिनशे झाडे लावण्याचा उपक्रमही राबवला, मात्र तो खूपच तोकडा असल्याचे लक्षात आल्यानंतर खांडेश्‍वराच्या त्याच डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासह त्यांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्याने कधीकाळी ओसाड वाटणारी ही टेकडी आज वनराईत परावर्तीत झाल्याचा दाखला त्यांनी दिला.

भगवद्गीतेत भगवंत पान, फुल, फळ व पाणी अर्पण केले तरीही आपण तृप्त होतो असे म्हणतात, त्यांच्या या संदेशाकडे गांभीर्याने बघितल्यास साक्षात भगवंतानेच गीतेतून आपल्याला वृक्षारोपणाचा संदेश दिल्याचे जाणवते. मात्र कालानुरुपे आपणच त्यात सोयीनुसार बदल केल्याचे मालपाणी म्हणाले. खरेतर, सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचा हंगाम सुरु आहे. राज्यातील सर्व कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून भगवंताचा हाच संदेश जनमनापर्यंत पोहोचवला तर ही चळवळ अधिक व्यापक होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.संजय व गिरीश मालपाणी यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. स्वदेश सेवाभावी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले, दत्ता कासार यांनी सूत्रसंचालन तर, उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संगमनेर व धांदरफळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वृक्षमित्र अशी ओळख असलेले उद्योजक मनीष मालपाणी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला संगमनेर परिसरातील एका ठिकाणाची निवड करुन तेथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्याच्या संवर्धनाचा उपक्रम राबवतात. त्यासाठी त्यांच्या पत्नी रचना मालपाणी यांनी ‘रोप बँक’ तयार केली असून आजवर सात लाखांहून अधिक रोपांचे विनामूल्य वितरणही करण्यात आले आहे. श्री.मालपाणी यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील कपारेश्‍वर, सायखिंडी व वेल्हाळे येथील देवाचा डोंगर विविध प्रकारच्या वनराईने नटला आहे, त्यात आता कारेश्‍वर टेकडीचाही समावेश झाला आहे.

Visits: 21 Today: 1 Total: 82834

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *