शहर भाजपातील मरगळ दूर सारण्यासाठी श्रीराम ‘बाण’ सज्ज! ‘ना युती, ना आघाडी’ आता फक्त देणार ‘एकला चलो रे’चा नारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडणीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा आहे. यापूर्वी भाजपाने पालिकेतील सत्तेचा वापर जनहितासाठीच केला, मात्र दुर्दैवाने गेल्या दोन दशकांपासून पालिकेत एकहाती सत्ता असूनही नागरिकांचे प्रश्‍न सुटत नाहीत. कार्यकर्त्यातील कार्यकर्तेपणा ही भाजपाची वेगळी ओळख आहे, त्यामुळे पद मिळाल्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा त्या पदाच्या जबाबदारीवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्यावर भर राहील असे रोखठोक मत भाजपाचे नूतन शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपूले यांनी व्यक्त केले.

मोठ्या नाट्यमय घडमोडींसह भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या निवडी गेल्यावर्षी पार पडल्या. मात्र या निवडीतून स्थानिक पातळीवरील भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने सत्ता असताना आणि आता नसतानाही भाजपाला फारसे काही करता आले नाही. आता मात्र भाजपाने पुन्हा एकदा कंबर कसली असून वादग्रस्त पदाधिकार्‍यांना बाजूला करुन नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातूनच शहराध्यक्षपदाची जबाबदारी माजी नगरसेवक व प्रसिद्ध विधिज्ञ श्रीराम गणपूले यांच्यावर सोपविण्यात आली, त्या पार्श्‍वभूमीवर दैनिक नायकच्या प्रतिनिधी वैशाली कुलकर्णी यांनी त्यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी गणपूले यांनी रोखठोक मते व्यक्त केली.


जिल्ह्याच्या राजकारणात संगमनेरचे महत्त्व अनन्य साधारण आहे. यापूर्वी पालिकेतील एकहाती सत्ता सांभाळतांना भाजपने केवळ नागरी हिताचा विचार केला. दुर्दैवाने गेल्या वीस-पंचवीस वर्षांत पालिकेतील सत्तेचा वापर नागरी हितापेक्षा राजकारणासाठी अधिक होवू लागल्याने सामान्य माणसाच्या समस्या कायम आहेत. माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठनेते राधावल्लभ कासट, (स्व) कुंदनसिंह परदेशी, (स्व) ल.का.देशपांडे आणि तत्कालीन भाजपा कार्यकर्त्यांनी राजकारणातून समाजकारणाचा वसा जोपासला. तेव्हापासून कार्यकर्त्यातील कार्यकर्तेपणा ही भाजपाची वेगळी ओळख ठरल्याचे गणपूले म्हणाले.


येथील राजकारणाला समृद्ध वारसा आहे. संगमनेरच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत भाजप आणि संघ यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करीत त्यांनी संगमनेरच्या विकासात भाजपाच्या स्मृतींची सोनेरी पाने चाळली. सन 1980 ते 85 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतित पावन संघटना आणि भाजपच्या माध्यमातून गणपूले यांनी सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम केले. आपली मूळ ओळख कार्यकर्त्यांची आहे. तर आपल्यावर सोपवण्यात आलेली शहराची जबाबदारी म्हणजे केवळ शोभेसाठी नाही तर, ती एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे गणपूले मानतात.


स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्ष स्वतःचे मार्केटींग करण्यात कमी पडलाही असेल, म्हणून त्याचा अर्थ भाजपचे कार्यकर्ते कामच करीत नाहीत असा काढता कामा नये असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करणं हे भाजपाचे धोरण आहे. त्यानुसार येथील कार्यकर्ते प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावित आहेत. जनसेवेतून व्यक्त होणारे नागरी समाधानाचे भाव हीच भाजपाची खरी कमाई आहे. शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असली तरी आपण भाजपाचा एक कार्यकर्ता आहात या भावनेतून मिळालेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले.


देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या सहा वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे. या काळात शेतकरी व गोरगरीबांसाठी अनेक योजना आल्याचे सांगतांना गणपूले यांनी अंत्योदय शिधापत्रिका धारकांसह सामान्य मध्यमवर्गीयांसाठी केंद्र सरकारने पाठवलेल्या अन्न-धान्याच्या मुद्द्यालाही हात घातला. लॉकडाऊनच्या काळात गरीब व सामान्यांची परवड होवू नये यासाठी केंद्राने देशातील सर्व राज्यांमध्ये मुबलक प्रमाणात अन्न-धान्याचा साठा पाठवला. मात्र येथील स्थानिक सत्ताधार्‍यांनी गरजूंपर्यंत तो पोहोचू दिला नाही. मोफत उज्ज्वला गॅस योजनेचेही असेच झाले; एका अर्जावर लाभार्थ्याला या योजनेचा सहज लाभ मिळत असतांनाही येथील नेत्यांनी जणू आपण गॅस वाटप करीत असल्याचे खोटे चित्र निर्माण केले. मात्र सत्य फारकाळ लपवून ठेवता येत नाही असा घणाघातही यावेळी गणपूले यांनी केला.

हिंदुत्त्ववाद्यांची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या अ‍ॅड.श्रीराम गणपूले यांच्या रुपाने शहर भाजपाला नवा अध्यक्ष मिळाला आहे. गेल्या वर्षभरात कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून त्यांना पुन्हा कार्यरत करण्यासह यापुढील सर्व निवडणूकांमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा द्यावा लागणार असल्याने नवनिर्वाचित भाजप शहराध्यक्ष नेमकी कशी व्यूहरचना आखतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 115870

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *