राहुरी शहरात मेडिकल फोडून हजारो रुपयांची चोरी व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण; दारुच्या दुकानातील चोरी फसली..

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील भर बाजारपेठेतील एक मेडिकल दुकान रात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपये चोरून नेले. तर मोटवाणी यांच्या दारुच्या दुकानाचे कुलूपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, सेंटर लॉक न तुटल्याने तेथे चोरी करता आली नाही. मात्र, या घटनेने व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीपेठ परिसरातील ज्ञानेश्वर थिएटर जवळ मनोज पारख यांचे मेडिकल आहे. बुधवारी (ता.22) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरला असलेली कुलूपे तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सामानाची उचकापाचक करून सामान अस्ताव्यस्त केले. त्यावेळी दुकानातील चार ते पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्याचप्रमाणे मोटवाणी यांचे दारुचे दुकान अज्ञात तीन चोरट्यांनी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी चोरट्यांनी शटरची कुलूपे तोडली. मात्र, त्यांना सेंटर लॉक तुटले नाही. त्यामुळे चोरीचा प्रयत्न असफल झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी मोटवाणी वाईन्स हे दारुचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. आता पुन्हा त्यांचे दारुचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोटवाणी वाईन्स दुकानाचे चालक जसविंदरसिंग कथुरिया यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे राहुरी शहरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून जोर धरु लागली आहे.
