मुसळधार पावसाने साईमंदिरालगतचा मंडप कोसळला सुदैवाने हानी टळली; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची साईभक्तांची मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. मात्र, जून महिना सरत आला असून अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारलेली असतानाच मंगळवारी (ता.21) दुपारी साईनगरीत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, श्री साईबाबा मंदिराच्या मुखदर्शन लगतचा मंडप अचानकपणे कोसळला. यामुळे साईभक्तांसह मंदिर प्रशासनाची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारची ही दुसरी घटना घडल्याने साईसंस्थानने याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी साईभक्तांकडून होत आहे.
जून हा मोठ्या पावसाचा महिना आहे. मात्र, वेळेत येणार्या मान्सूनने महिना संपत आला तरी सर्वदूर हजेरी लावली नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. अशातच मंगळवारी दुपारी अत्यंत गर्दी असणार्या साईनगरीत वादळीवार्यासह दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. परंतु, पावसामुळे साई मंदिर परिसरातील मुखदर्शन लगत असलेला मंडप कोसळला. यामुळे साईभक्तांसह मंदिर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
मंडपावर पावसाच्या पाण्याचे वजन अधिक झाल्याने हा मंडप खाली पडला. कडक उन्हापासून भाविकांना सावली मिळावी, यासाठी साईबाबा मंदिर परिसर आणि भाविकांचा वावर असलेल्या ठिकाणी साईसंस्थान प्रशासनाकडून मंडप टाकण्यात आलेला आहे. मात्र, मंडपावर पावसाचे पाणी साचल्याने पाण्याच्या वजनाने हा मंडप खाली कोसळला. यावेळी मंडपाखाली कोणीही नसल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. दरम्यान, अशा प्रकारची ही दुसरी घटना घडल्याने साईसंस्थानने याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता साईभक्तांकडून जोर धरु लागली आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, जून महिला संपत आला तरी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे खरीप हंगामाची कामे खोळंबली असून, शेतकर्यांच्या आभाळाकडे नजरा खिळून आहेत. अशातच अधून-मधून पडणारा पाऊस काहीसा दिलासा देणारा ठरत असला तरी खरीप पिकांसाठी मोठ्या पावसाचीच प्रतीक्षा आहे.