सामायिक बांधावरुन मारहाण, तिघे गंभीर जखमी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेताच्या सामायिक बांधावरील सिमेंट खांब तोडल्याच्या कारणावरून फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या आई-वडीलांवरही धारदार कोयता व लोखंडी पाईपने वार करुन त्यांना गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील निमगाव टेंभी येथे रविवारी (ता.26) सकाळी अकराच्या सुमारास घडली.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निमगाव टेंभी येथील फिर्यादी राजेंद्र सुखदेव वर्पे (वय 36) यांच्या सामायिक बांधावरील सिमेंट खांबाचे अज्ञात वाहनाने नुकसान केले. याबाबत सचिन बाजीराव वर्पे याने सरपंच व पोलीस पाटील यांच्या समोर राजेंद्र वर्पे यास जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाले. फिर्यादी, त्याची पत्नी, आई, वडील असे घरात असताना, आरोपी सचिन, त्याचे वडील बाजीराव वर्पे, मेव्हणा राहुल कैलास पानसरे व सासरा कैलास गजाबा पानसरे यांनी घरात घुसून शिवीगाळी व दमदाटी केली. राहुल पानसरे याने लोखंडी पाईपने राजेंद्रच्या डोक्यात मारहाण केली. सोडवण्यासाठीमध्ये आलेले वडील सुखदेव यांच्या डोक्यात बाजीराव वर्पे याने त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच आई गयाबाईच्या हाताला झटापटीत कोयता लागला. तसेच घरातील टीव्ही संच व गॅस शेगडीचे नुकसान करुन ते पळून गेले. या मारहाणीत राजेंद्र, सुखदेव व गयाबाई वर्पे गंभीर जखमी झाल्याने त्यांना संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी आरोपी सचिन बाजीराव वर्पे, बाजीराव सुखदेव वर्पे (दोन्ही रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर) व सचिन वर्पे याचा मेव्हणा राहुल कैलास पानसरे व सासरा कैलास गजाबा पानसरे (दोन्ही रा. जाखुरी, ता संगमनेर) यांच्या विरोधात तालुका पोलिसांनी भादंवि कलम 452, 326, 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जे. ए. सय्यद करीत आहे.