औरंगजेबाच्या अवलादींची संगमनेरात पुन्हा वळवळ! घारगावमध्ये गुन्हा दाखल; ‘आलमगिर’ म्हणत मराठी मनांना दुखावले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे मोबाईलने जगात क्रांती घडवल्याची असंख्य उदाहरणे दररोज समोर येत असताना दुसरीकडे काही जणांकडून मात्र या प्रभावी माध्यमाचा वापर करुन मनामनामध्ये द्वेष निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहे. संगमनेरात यापूर्वीही अशाप्रकारच्या काही घटनांमधून सामाजिक सौहार्दावर काडी टाकण्याचे अयशस्वी प्रयोग झाले. मात्र जागृत नागरिकांनी ‘त्या’ काडीचे विस्तवात रुपांतर होवू दिले नाही. त्यामुळे किमान संगमनेर तालुक्यात अशा गोष्टी घडल्या नाहीत. मात्र केवळ द्वेष पसरवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करणार्या औरंगजेबाच्या काही अवलादी आता पुन्हा एकदा सक्रीय झाल्या असून मराठ्यांच्या पराक्रमाने स्वराजधानीपासून हजारो मैलाच्या अंतरावर माती झालेल्या मोगल बादशहा औरंगजेबाला ‘आलमगिर’ संबोधून मराठी मनांना चुचकारण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत. त्याचा परिणाम घारगावमधील एकावर गुन्हा दाखल होण्यात झाला असून अशा प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाहीत यासाठी पोलिसांनीही कठोर भूमिका वठवण्याची गरज निर्माण झाली आहे.

मराठ्यांचे पारिपत्य करण्याचा हेतू घेवून दिल्लीपासून हजारो मैल अंतरावर असलेल्या महाराष्ट्रात दाखल झालेल्या औरंगजेबाने सलग 27 वर्ष सह्याद्रीच्या पाषाणाला धडका दिल्या. मात्र त्याच्या विशाल फौजेला कणखर सह्याद्रीच्या माथ्यावरील धोंडाही पदरी पाडता आला नाही आणि त्यातच वार्धक्याने अहमदनगरच्या बंद कोटात त्याच्या छाताडातील प्राणपाखरु 1707 साली उडून गेला. त्यावेळी त्याचा देह पुन्हा दिल्लीला सुखरुप नेणं अशक्य असल्याने त्याच्याच बापाने जहागिरी म्हणून आपल्या शासनकाळात त्याला दिलेल्या तत्कालीन औरंगाबादमध्ये त्याचे थडगे बांधण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर आजवर महाराष्ट्रच नव्हेतर भारतातही कोणी त्याची आठवण काढली नाही. मात्र अलिकडच्या काळात अचानक कधीकाळी आलमगिर ठरलेला मात्र मराठ्यांनी मराठीमातीतच गाडलेल्या या क्रूरकर्माचे उदात्तीकरण सुरु झाले.

मध्यंतरी या क्रूरकर्मा मोगल बादशहाच्या उदात्तीकरणाचा पहिला प्रयोग जिल्ह्यात नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात राबविण्यात आला, त्याला राष्ट्रप्रेमी मुसलमानांनीही मोठा विरोध दर्शविला. त्यामुळे अशाप्रकारच्या कृत्यातून जिल्ह्यातील सौहार्दाचे वातावरण दुषीत करणार्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असतांना त्यानंतरही शेवगाव, मिरजगाव सारख्या ठिकाणी त्याची काहीशी धाकधूक उमटली. परंतु पोलीस प्रशासनाने उचललेला कारवाईचा बडगा आणि हिंदू-मुस्लिम समाजाने दाखवलेले सामंजस्य यामुळे समाज विघातक प्रवृत्ती यशस्वी होवू शकल्या नाहीत.

यापुढे अशा गोष्टी घडणार नाहीत असे काहीसे वातावरण निर्माण होत असतानाच आता संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून सौहार्दाच्या दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेतही माळवदवाडीतील (घारगाव) मोईश हनीफ कुरेशी या तरुणाचा वापर करुन औरंगजेबाच्या काही अवलादींनी महाराष्ट्राच्या मातीत खाक झालेल्या औरंगजेबाला ‘आलमगिर’ म्हणत पुन्हा जिवंत करण्याचा घाट घातला आहे. त्याच्या या कृतीतून दोन समाजात तेढ निर्माण होईल असा त्याच्या वापरकर्त्यांचा अंदाज होता, मात्र सूज्ञ नागरिकांनी तो फोल ठरवत सदरची कृती घारगाव पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी घारगावच्या ऋषीकेश भोर या तरुणाने पुढाकार घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडसंहितेच्या कलम 505 (2) अन्वये आरोपी मोईश कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या 6 जून रोजी संगमनेरातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या ‘भगवा मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात जिल्ह्याच्या विविध भागासह संगमनेर तालुक्यातील जवळपास 50 हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. इतक्या मोठ्या संख्येने माणसं जमा होवूनही हुल्लडबाजांनी समनापुरात घडवलेला किरकोळ प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यावरुन संगमनेर तालुक्याचा सामाजिक एकोपा ठळकपणे समोर आलेला असताना आता घारगावमधील एकाकडून पुन्हा ‘आलमगिर’ म्हणत मोबाईलवरील ‘स्टेट्स’च्या माध्यमातून मराठी मनांना चुचकारण्याचा प्रयत्न होणं सामाजिक सौहार्दासाठी पोषक ठरणार नाही. पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जावून संगमनेरात पुन्हा औरंगजेबाच्या अवलादी जिवंत होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.

