आढळा प्रकल्प ओसंडल्याने पंधरा गावांमध्ये जल्लोष!
आढळा प्रकल्प ओसंडल्याने पंधरा गावांमध्ये जल्लोष!
बिताका डोंगरावरील पाणी वळविल्यास पाण्याची परवड थांबेल ः चकोर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर, अकोले व सिन्नर तालुक्यातील जवळपास अडीच हजार हेक्टर जमिनीसाठी वरदान ठरलेला आढळा प्रकल्प रविवारी माध्यान्नाच्या वेळी तुडूंब झाला. बिताका डोंगरांच्या रांगेतून उगम पावणार्या आढळा नदीवरील हा प्रकल्प ओसंडल्याने या तीनही तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. 1060 द.ल.घ.फूट क्षमतेचा आढळा जलाशय भरल्याने धरणाखालील आठ साखळी बंधारे भरण्यास सुरुवात झाल्याने आढळेच्या लाभक्षेत्रात चैतन्य दाटले आहे. बिताका परिसरात मोठा पाऊस होतो, मात्र बहुतेक पाणी पश्चिमेकडे वाहून जात असल्याने धरण भरण्यास मोठा विलंब होतो. बिताकावरील संपूर्ण पाणी आढळा खोर्यात वळविल्यास पाण्याची परवड थांबून त्याचा मोठा फायदा लाभक्षेत्रात मिळेल अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी व्यक्त केली.
अकोले तालुक्याच्या पूर्वभागातून वाहणार्या आढळा नदीवर देवठाण येथे सन 1960 साली 1 हजार 60 द.ल.घ.फूट क्षमतेचे आढळा धरण बांधण्यात आले. प्रत्यक्षात तब्बल सोळा वर्षांनी सन 1976 मध्ये पूर्ण क्षमतेने भरलेला हा पाटबंधारे प्रकल्प अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी वरदान ठरला आहे. गेल्या काही दिवसांत बिताका डोंगराच्या माथ्यावर कोसळणार्या श्रावणसरींनी पाडोशी व सांगवी जलाशयांचे साठे फुगवल्यानंतर आढळा धरण कधी भरणार याची उत्सुकता ताणली गेली होती. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अखेर धरणाच्या सांडव्यावरुन साधारणतः शंभर क्युसेक्स पाण्याने उसळी मारली आहे हे धरण तुडूंब झाल्याचे जाहीर करण्यात आले.
आढळा धरणाची एकूण साठवण क्षमता 1 हजार 60 द.ल.घ.फूट असून मृतसाठा 85 द.ल.घ.फूट आहे. धरणाची एकूण लांबी सुमारे 623 मीटर इतकी असून उंची 40 मीटर आहे. माती प्रकारात बांधलेल्या या धरणाचा सांडवा ओपन चॅनेल पद्धतीचा असून सांडव्याची विसर्ग वहन क्षमता सुमारे 5 लाख 4 हजार 900 क्युसेक्स आहे. बांधून पूर्ण झाल्यापासून आत्तापर्यंत आढळा धरण 25 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र सुमारे 2 हजार 422 हेक्टर असून काही प्रमाणात खरीप हंगामात व मुख्यत्त्वे रब्बी हंगामात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सहा, संगमनेर तालुक्यातील सात, तर सिन्नर तालुक्यामधील दोन गावांना या धरणाच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होतो.
आढळा धरणामधून अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी, गणोरे व डोंगरगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. धरणाच्या जलाशयातून जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांना उपसा जलसिंचन योजनांसाठी देखील परवाने देण्यात आले आहेत. या धरणाचा डावा कालवा 8.80 किलोमीटर लांबीचा व 42 क्युसेक्स वहन क्षमतेचा असून त्याद्वारे सिन्नर तालुक्यातील कासारवाडी व नळवाडी या दोन गावांना व अकोले तालुक्यातील डोंगरगाव, संगमनेर तालुक्यातील चिकणी, निमगाव भोजापूर, जवळेकडलग व राजापूर या चार गावांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तसेच या धरणाचा उजवा 11.80 किलोमीटर लांब व 68 क्युसेक्स वहन क्षमतेचा असून त्याद्वारे अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी व गणोरे या पाच गावांना व तसेच संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, जवळेकडलग व धांदरफळ या चार गावांना सिंचनासाठी पाणी पोहोचविले जाते.
आढळा धरणाच्या खालील बाजूस आढळा नदीवर सुमारे आठ कोल्हापूर टाईप बंधारे व सिमेंट बंधारे बांधण्यात आलेले असून धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाच्या सांडव्यातून वाहणार्या पाण्यातून हे सर्व बंधारे भरले जातात. त्यामुळे रब्बीच्या पीकांनाही पाणी उपलब्ध होते. आढळा नदीचा उगम हा सह्याद्रीच्या डोंगरातील बिताका डोंगराच्या पोटातून होतो. तेथे दरवर्षी अतिवृष्टी होते. मात्र घाटमाथ्यावर पडणार्या पावसाचे पाणी डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात पश्चिमेकडे वाहून जाते. हे पाणी अडवून ते आढळा धरणाकडे वळविल्यास आढळेच्या पाणलोटातील पाण्याचा दुष्काळ दूर सारता येवू शकतो. याबाबतची गेल्या दहा वर्षांपासून मागणी होत असून संगमनेर-अकोल्यातील लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने हा विषय सोडवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
पाचपट्ट्याच्या रांगेतील बिताका डोंगरावरुन उगम पावणार्या आढळा नदीवरील देवठाण प्रकल्प (आढळा धरण) रविवारी दुपारी ओसंडल्याने लाभक्षेत्रात समाधान पसरले आहे. सन 1960 साली राज्याच्या निर्मितीसोबतच या धरणाच्या निर्मितीलाही सुरुवात झाली आणि 1976 साली हे धरण राष्ट्रसेवेत दाखल झाले. तेव्हापासून आजवर 25 वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तर 19 वेळा धरणाचे पोट खपाटीलाच राहिले आहे. या धरणावर अकोले, संगमनेरसह नाशिक जिल्ह्यातील दोन गावांचे सिंचन अवलंबून आहे. यंदा हे धरण भरल्याने व अजूनही पाऊस शिल्लक असल्याने लाभक्षेत्रात आनंद दाटला आहे.