आदिवासींसाठी काम करणार्यांमध्ये मधुकर पिचड अग्रस्थानी ः गडकरी माजी मंत्री मधुकर पिचड यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा
नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी समाजासाठी योगदान देणार्या काही मोजक्या तीन-चार नेत्यांपैकी मधुकर पिचड यांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. याचबरोबर अगस्ति कारखाना टिकवायचा असेल आणि त्याचा विकास करायचा असेल तर तो पिचड साहेबांच्या ताब्यात द्या. अन्यथा त्याचे बिकट हाल होतील असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राज्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्यात आले होते. यावेळी ते पुढे म्हणाले, येणार्या काळात शेतकरी हा अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता बनला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात माझा व मधुकर पिचड यांचा प्रथम परिचय झाला. त्यावेळी ते मंत्री होते. लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. पिचडांच्या पिढीने देशात विकास करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांतून परिवर्तन आले आहे असेही त्यांनी अधोरेखित केले.
या सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर, हेमलता पिचड, पूनम पिचड, शिवाजी धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, अभियंता चकोर, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, आशा बुचके, जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सीताराम देशमुख, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.सुनील शिंदे, दीपक महाराज देशमुख, महिला तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे, काळू भांगरे, विजय भांगरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अरुण शेळके, कैलास जाधव, सोमनाथ मेंगाळ, संदीप शेटे, भाऊसाहेब वाकचौरे, धनंजय संत, शंभू नेहे, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, उद्योजक नितीन गोडसे, राजेंद्र गोडसे, चंद्रकांत घुले, नगरसेवक शरद नवले, प्रतिभा मनकर, वैष्णवी धुमाळ, विजय पवार, जनाबाई मोहिते, सागर चौधरी, तमन्ना शेख, शीतल वैद्य, माधुरी शेणकर, प्रसन्ना धोंगडे, सौरभ देशमुख आदिंसह अकोले तालुक्यातील आढळा, प्रवरा, मुळा व पठारभागातील कार्यकर्ते, नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मधुकर पिचड यांचा सपत्नीक अभीष्टचिंतन गौरव करण्यात आला. यावेळी ‘कळसूबाईचा शिखर यात्री-50 वर्षांचे विकासपर्व’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. देशात साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस हे हमखास नफा देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकर्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करावे. इथेनॉल विकले तरच साखर कारखाने टिकतील. पुढच्या महिन्यापासून फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कूटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील. इथेनॉलची किंमत पेट्रोलच्या निम्मी आहे. शिवाय दोन्ही इंधनातून वाहनांना सारखेच अॅव्हरेज मिळेल. इथेनॉलमधून प्रदूषण होणार नाही. त्यामुळे इथेनॉलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. त्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्याला इथेनॉल पेट्रोल पंप मिळवून देतो. अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी खासदार डॉ. सुजय विखे व वैभव पिचड यांनी पुढाकार घ्यावा, असेही गडकरी म्हणाले. गेली 50 वर्षे पूर्वीचे अकोले फार वेगळे होते. येथे रस्ते सोयीचे नव्हते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार, सावकारशाही हे सर्व फार भयानक होतं. आमच्या डोळ्यादेखत पावसाचे पाणी खाली वाहून जात होते. तेव्हा पाटपाण्याची चळवळी उभी करुन मुळा, प्रवरा आणि आढळावर धरणं बांधली. आत मी आता सुखाने मरणार आहे. मी जे जे इच्छिले ते मी पूर्ण करू शकलो, त्यामुळे मी समाधानी आहे. आता नामदार गडकरी यांनी तोलारखिंड फोडू द्यावी, अशी मागणी सत्काराला उत्तर देताना मधुकर पिचड यांनी केली. स्वागत व प्रास्तविक माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर आभार जालिंदर वाकचौरे यांनी मानले.
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही तांत्रिक कारणास्तव या कार्यक्रमाला येता आले नाही, त्यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे शुभेच्छा संदेशा पाठविला. त्यात म्हणाले, माजी मंत्री मधुकर पिचड हे आदिवासी बांधवांचे भक्कम आधारस्तंभ आहेत. एक व्यक्ती अगणित लोकांचे आयुष्य उजळून टाकू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मधुकर पिचड होय. त्यांनी जीव ओवाळून टाकणारे अनेक कार्यकर्ते उभे केले. त्यांचे सिंचन, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांची परंपरा वैभव पिचड पुढे नेत आहे.