रविवारी भावी राजकीय उमेदवारांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन! संगमनेर पत्रकार मंचचा उपक्रम; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हक्क, कर्तव्य व जबाबदारीवरही मार्गदर्शन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील पत्रकारांच्या संघटनेने अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जनसेवा करु इच्छिणार्‍यांसाठी रविवारी (ता.19) संगमनेरात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचे गाढे अभ्यासक आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यश कसे मिळवावे या विषयीचे मार्गदर्शक सारंग कामतेकर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. चुकवू नये अशा या व्याख्यानाला संगमनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करणार्‍यांसह आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पदार्पण करु इच्छिणार्‍यांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने करण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठा आणि शक्तीशाली लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य या संज्ञेप्रमाणे आपल्या देशात अगदी गावपातळीवरील ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदापर्यंत कोणालाही निवडणूक लढवता येते. अनेक शतकांच्या संघर्षानंतर जेव्हा देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यानंतरच्या कालावधीत राजकारणातून समाजसेवेचा वसा घेतलेल्या असंख्य नेत्यांनी देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ध्येय समोर ठेवून काम केले. जवळपास पाच-सात दशकांच्या या कालावधीत राजकीय आखाड्यात असलेल्या विविध पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी अगदी समर्पित भावनेने काम केले, त्यातूनच सुमारे एक हजार वर्षांच्या परकीय गुलामीनंतरही आपला देश सन्मानाने उभा राहीला.

मात्र गेल्या काही वर्षांत देशाच्या राजकारणात समाजसेवेचा वसा घेतलेल्यांसह याविषयीचा गंधही नसलेल्यांचा अधिक भरणा झाला आहे. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणार्‍यांच्या मूळ उद्देशालाच धक्का लावण्याचे काम सुरु झाले आहे. ज्या संस्थेची निवडणूक लढविली जाते त्या संस्थेबाबत कोणतीही माहिती नसलेले, आपले काम, हक्क, कर्तव्य आणि त्या पदाच्या माध्यमातून खांद्यावर येणार्‍या जबाबदार्‍या याबाबत निवडणूक लढविणारा मोठा वर्ग अनभिज्ञ असल्याने ही स्थिती आणखी खालावत असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करुन संगमनेर पत्रकार मंचने अभिनव प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असून ग्रामीण विकासाचा मुख्य स्त्रोत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रवेश करुन समाजसेवा करण्याची इच्छा असणार्‍यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचा गाढा अभ्यास असलेले, विविध सार्वजनिक पातळीवरील निवडणुकांचे तंत्र व मंत्र यांची सखोल जाण असलेले, अभ्यासू व्यक्तिमत्त्व सारंग कामतेकर हे ‘स्थानिक स्वराज्य संस्था : लोकप्रतिनिधींचे हक्क, कर्तव्य व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

उद्या रविवार 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मालपाणी लॉन्स, कॉलेजरोड येथे होणार्‍या या व्याख्यानाला राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या, करु इच्छिणार्‍या व या क्षेत्राविषयी माहिती मिळवण्याची लालसा असलेल्यांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख श्याम तिवारी, संघटनेचे उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय अहिरे, प्रकल्प समिती सदस्य भारत रेघाटे, मंगेश सालपे, सतीश आहेर, सोमनाथ काळे, नीलिमा घाडगे, सुशांत पावसे, संजय साबळे यांच्यासह संघटनेचे सदस्य सर्वश्री आनंद गायकवाड, नितीन ओझा, शेखर पानसरे, अंकुश बुब, सचिन जंत्रे, अमोल मतकर, राजू नरवडे, सुनील महाले, बाबासाहेब कडू, हरीभाऊ दिघे व काशिनाथ गोसावी यांनी केले आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 121195

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *