स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प! देशातील 30 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांसह 30 लाखांहून अधिक योगप्रेमी होणार सहभागी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रचेतना जागवणार्या या ऐतिहासिक उपक्रमात देशातील सुमारे 30 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांसह एकूण 30 लाखांहून अधिक योगप्रेमी सहभागी होणार आहेत. या उपक्रमात शाळा, समूह अथवा व्यक्तीगत स्वरुपातही सहभागी होता येणार असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करावी लागेल. गुरुवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व योगमहर्षी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत नावनोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून अधिकाधिक योगप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले.
पुढील वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या क्षणाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्व कल्याणासाठी जगाला योगविद्या देणार्या भारतात योगाच्या प्रतीविद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करण्यासाठी गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्टफुलनेस संस्था व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या पाच संस्थांनी संयुक्तपणे 75 कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पुढील वर्षी 1 जानेवारीपासून सुरुवात होणार असून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे.
भारत सरकारच्या आयुष आणि खेल मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य प्राप्त होणार्या या उपक्रमात वरील कालावधीत सहभागी योगप्रेमींना दररोज 13 सूर्यनमस्कार घालावे लागतील. भारतीय संस्कृतीचे मूलतत्त्व असलेल्या योगासनांच्या माध्यमातून 75 कोटी सूर्यनमस्कार घालून विश्व निरामय व्हावे आणि युवा पिढी योगशास्त्राशी जोडली जावी असा आयोजनकर्त्यांचा मानस आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी www.75suryanamaskar.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून व अन्य योगप्रेमींना व्यक्तिगत स्वरुपातही नोंदणी करुन या उपक्रमात सहभागी होता येईल. 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्पात सहभागी होवून सूर्यनमस्कार घालणार्या सर्व योगप्रेमींना योगमहर्षी स्वामी रामदेव यांच्यासह योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महानुभावांच्या स्वाक्षरीतील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.2) हरिद्वार येथील पतंजली योगपीठात नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ झाला. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, योगमहर्षी स्वामी रामदेव, आचार्य बालकृष्ण, डॉ.जयदीप आर्य व डॉ.संजय मालपाणी आदी उपस्थित होते.