‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ प्रा.पठारे यांना जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून दिला जाणारा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर यंदाचा श्री.पु.भागवत पुरस्कार श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे.
मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा केली. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रा.रंगनाथ पठारे यांनी राज्य सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, वाड्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपद भूषविलेले आहे. तसेच श्रीरामपूरमधील शब्दालय प्रकाशन संस्थेने राज्यात अनेक ठिकाणी आणि गोव्यात पुस्तक प्रदर्शने भरवून साहित्य सेवा दिलेली आहे. या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.