कापूस व मका पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन
कापूस व मका पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन
राहुरी कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या शिवारफेर्या
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी तालुक्यात सध्या कापूस व मक्याच्या पिकावर कीडरोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. हा कीडरोग नियंत्रणात असला तरी प्रसार मात्र वेगाने होत आहे. त्यामुळे कापूस व मका पिकांवरील किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शिवारफेर्या करुन शेतकर्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. यामुळे शेतकर्यांना शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करणे सोपे होणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकलपाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.नंदकुमार भुते, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, मंडल कृषी अधिकारीन प्रशांत डहाळे यांनी राहुरीच्या तनपुरेवाडी परिसरात मका व कापूस पिकांची पाहणी केली. शेतकरी संदीप शिरसाठ, अमोल तनपुरे, वैभव गिरगुणे, सचिन तरकसे, पर्यवेक्षक राजू आंबेकर, तुळशीराम पवार, कृषी सहाय्यक शरद लांबे, चंद्रकांत म्हसे, ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक धीरज कदम उपस्थित होते. अनिल तनपुरे, सुनील तनपुरे यांची मका व रंगनाथ तनपुरे यांच्या कपाशीची पथकाने पाहणी केली. कपाशीवर शेंदरी बोंडअळी व मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कीडरोग वेगाने पसरण्यास सुरूवात झाली आहे. परंतु अद्याप धोक्याची पातळी गाठलेली नाही. त्यामुळे कीडरोगाच्या नियंत्रणासाठी पथकाने शेतकर्यांना विविध उपाययोजना सूचविल्या.
पावसाळ्याच्या आधी ‘टोळधाड’ संकटाची चाहूल दिसू लागली होती. त्यात कोरोना संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे बाजारभाव कमी अशा स्थितीतही शेती फुलविली. आता खरीप हंगामही वाया गेला तर मोठे आर्थिक ओढावेल. त्या दृष्टीने कृषी विभागाने कंबर कसली असून कपाशी व मक्यावर आलेल्या कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध शास्त्रोक्त उपाययोजना शेतकर्यांना सूचविल्या आहेत. त्यानुसार शेतकर्यांनी प्रयोग करणे गरजेचे आहे.
राहुरी तालुक्यात कपाशीखाली 11 हजार 46 हेक्टर क्षेत्र तर मक्याखाली 3083 हेक्टर क्षेत्र आहे. कपाशीला सध्या बोंडे येण्यास प्रारंभ झाला आहे. किडीचा प्रादुर्भाव तुरळक ठिकाणी दिसू लागला आहे. प्रत्येक कृषी सहाय्यक रोज पाच ठिकाणी भेटी देऊन किडीची माहिती संकलित करीत आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकर्यांना मार्गदर्शनही सुरू आहे.
– महेंद्र ठोकळे (तालुका कृषी अधिकारी, राहुरी)