काँग्रेसच्या आंदोलकांचा परिवहन महामंडळाच्या बसला ‘दे धक्का’! आंदोलनासमोरच बस निकामी; आंदोलक व पोलिसांनी ढकलगाडी करुन नेली स्थानकात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचार्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. यापूर्वीच्या अनुभवाप्रमाणे हे आंदोलनही आठ/पंधरा दिवसांत थंड होईल असे वाटत असतांना कर्मचार्यांनी ते फोल ठरवित तब्बल सहा महिने राज्यातील लालपरीची धावाधाव पूर्णतः थांबवली. त्याचा परिणाम महामंडळाच्या ताफ्यातील शेकडों बस आजारी पडल्या आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज राज्यातील सत्तारुढ आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने घेतला. राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनीया गांधी व काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनस्थळीच आज अहमदनगर आगाराची बस बंद पडली आणि बघताबघता या बसने परिसरात वाहतुकीचा खेळ केला. त्यामुळे आंदोलनावरील लक्ष्य विचलीत होवू लागल्याने अखेर आंदोलकांनीच पोलिसांच्या मदतीने ‘दे धक्का’ करीत या बसची ढकलगाडी केली आणि तिला बसस्थानकात नेवून सोडले. हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे उद्भवला असला तरीही त्याची खमंग चर्चा मात्र गावभर सुरु आहे.

आज (ता.17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच हा प्रकार घडला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनीया गांधी आणि काँग्रेसनेते राहुल गांधी यांची सध्या सक्तवसुली संचनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु असल्याने त्या विरोधात देशभर काँग्रसजनांनी आंदोलनाचा धुरळा उडविलेला आहे. गांधी परिवाराने देशासाठी दिलेले बलिदान, देशाच्या विकासात, प्रगतीत या परिवाराचे योगदान पाहता केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देण्यासाठी सुरु असलेला चौकशीचा छळ त्वरीत थांबवावा अशी मागणी घेवून संगमनेरातही आज धरणे आंदोलन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे व एकवीरा फाऊंडेशनच्या संचालीका जयश्री थोरात-जैन यांच्या उपस्थित या आंदोलनाला सुरुवात झाली. नेमकं त्याचवेळी अहमदनगरहून नाशिकच्या दिशेने चाललेली राज्य परिवहन महामंडळाची बस (क्र.एमच.एच.06/एस.8452) संगमनेर बसस्थानकाजवळ पोहोचली. आंदोलनाला मोठी गर्दी झाल्याने यावेळी नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक रेंगाळली होती. त्यातच या बसने महामार्गावरुन बसस्थानकाकडे वळण घेतले आणि ती भररस्त्यातच बंद पडली.

समोर राज्यातील दिग्गज नेते मंडळी, वरीष्ठ अधिकार्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि समोर आंदोलकांची मोठी गर्दी त्यात बस बंद पडल्याने तिच्या चालकाचा एकच गोंधळ उडाला. त्या बिचार्याने महद् प्रयास करुन बस सुरु करण्याची शर्थ केली, मात्र काही केल्या ती सुरु होण्याचे नाव घेत नसल्याने पुणे-नाशिक महामार्ग तुंबला. त्यामुळे चोहोबाजूंनी वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज येवू लागल्याने आंदोलनावरील लक्ष्य विचलीत होवून सगळ्यांचे लक्ष बंद पडलेली बस, ओसंडलेला महामार्ग आणि हॉर्नचा आवाज याकडे केंद्रीत होवू लागले.

त्यामुळे अखेर आंदोलकांनीच आपले धरणे आंदोलन काही क्षणासाठी ‘स्थगित’ करुन बसला धक्का देण्यास सुरुवात केली. आता मंचावर नामदार बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे व आमदार डॉ.तांबे, भगिनी दुर्गा तांबे व मुलगी जयश्री यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित असल्याने पोलिसांनाही आपली ऐट सोडून बसला धक्का मारण्याची वेळ आली. अखेर आंदोलक आणि पोलीस यांनी ‘साथी हात बढाना साथी रेऽ’ म्हणत बंद पडलेल्या बसची ‘ढकलगाडी’ केली आणि प्रवेशद्वारापासून तिला ढकलीत ढकलीत थेट बसस्थानकातच नेवून सोडली. हा प्रकार अनेकांसाठी विनोदाचा ठरला, त्यामुळे भरउन्हात जमलेल्या आंदोलकांनाही हास्याच्या शितलतेची झुळुक अनुभवण्यास मिळाली. हा प्रकार तांत्रिक बिघाडातून घडला असला तरीही त्याची ‘खमंग’ चर्चा मात्र सकाळपासूनच गावभर सुरु झाली.

गेल्या दिवाळीपासून राज्य परिवहन महामंडळातील सुमारे लाखभर कर्मचार्यांनी संप पुकारला होता. जवळपास सहा महिने चाललेल्या या संपाने परिवहन महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच लालपरीची चाके तब्बल सहा महिने थांबवली. त्याचा परिणाम महामंडळाच्या अनेक बस आजारी पडल्या असून भर रस्त्यातच त्यात बिघाड होवून त्या बंद पडण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. आजचा प्रकारही असाच असून अहमदनगरपासून संगमनेरपर्यंत व्यवस्थित पोहोचलेली ही बस संगमनेरात येतायेता बंद पडली आणि अखेर त्यातील प्रवाशांना गाडी बदल करुन पुढील प्रवास पूर्ण करावा लागला.

