राहुरी विद्यापीठात पहारेकर्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी (ता.2) पहाटे कर्तव्यावर असलेल्या एका पहारेकर्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत देवराम पवार (वय 38, रा.खडांबे खुर्द, ता.राहुरी) असे या पहारेकर्याचे नाव आहे. गेल्या दहा वर्षांपासून सतत व एकाच जागेवर रात्रपाळीची जबाबदारी करावी लागत असल्याने मयत चव्हाण हे तणावात होते. याच दरम्यान सततची रात्रपाळीचे कर्तव्य निभावत लागत असल्याने पवार यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे त्यांचा संसार मोडला होता, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर गेले. बी-बियाणे अंतर्गत ‘ड’ विभाग येथे त्यांच्याबरोबर रामाजी गेणूभाऊ शिंदे हा तरूण कर्तव्यावर होता. दोघे आळीपाळीने जागून पहारा देत होते. 2 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान चंद्रकांत पवार हा मृतावस्थेत आढळून आले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या रामाजी शिंदे याने पवार यांच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पवार यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला. याचा अहवाल त्याच्या शवविच्छेदनानंतर प्राप्त होईल. मात्र त्यांच्या मृत्यूने खडांबे खुर्द व विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बर्हाटे हे करीत आहेत. पवार यांच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
