साईभक्ताकडून पाच हजार किलोच्या आमरसाची पंगत! सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या आंब्याची देश-विदेशात चर्चा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
येथील श्री साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्मीय देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. याठिकाणी देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भक्त हजेरी लावून विविध प्रकारचे दान करत असतात. मात्र पुणे जिल्ह्यातील एका भक्ताने चक्क पाच हजार किलो केशर आंबे श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या प्रसादालयात देणगी स्वरुपात दान केले असून या केशर आंब्याची चर्चा देश-विदेशात पोहचली आहे.

दरम्यान आत्तापर्यंत पंढरपूरच्या विठूरायाला एका भक्तांकडून सात हजार किलो हापूस आंब्याचे दान दिल्याचे बघितले होते. परंतु शिर्डी येथील साईबाबांना देखील मागील दोन वर्षांपासून केशर आंब्याचे दान येऊ लागले आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्त दीपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले 5 हजार किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईप्रसादालयात देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना बानायत म्हणाल्या, साईभक्त दीपक करगळ यांची स्वतःची मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्या पिकविलेले व उच्च प्रतीचे आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून साईभक्त करगळ हे केशर आंबे संस्थानला देणगी स्वरुपात देत आहे. यावर्षी सुमारे 4 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 5 हजार किलो केशर आंबे देणगी स्वरुपात संस्थानच्या श्री साईप्रसादालयात दिलेले आहे. दोन दिवस या आंब्यांच्या रसाचे प्रसाद भोजन साईभक्तांसह दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना, अनाथाश्रम, वृध्दाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार असल्याचेही बानायत यांनी सांगितले.

Visits: 174 Today: 1 Total: 1870863

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *