बाराव्या दिवशी निघाले संगमनेर पोलिसांचे बाप्पा विसर्जनाला! बंदोबस्ताचा तणाव निवळताच थिरकले अधिकारी आणि अंमलदारांचे पाय..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पितृपक्षाला सुरुवात होवून दुसरा दिवस मावळला असतांना संगमनेरात मात्र गणेशोत्सवाचा जल्लोश अद्यापही कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दहा दिवसांचा बंदोबस्त, त्यानंतर लागलीच पैगंबर जयंतीचा जुलूस यामुळे घरदार विसरुन कर्तव्य प्रथम मानणार्‍या पोलिसांनी मोठ्या श्रद्धेने पोलीस ठाण्यात बसवलेल्या बाप्पांना आज (ता.30) वाजत गाजत, फुलांची उधळण करीत जल्लोशपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. शहर पोलीस ठाण्यातून चक्क पोलिसांनी काढलेली ही मिरवणूक पाहणार्‍यांनाही सुखद् धक्का देणारी ठरत आहे. कामाचा प्रचंड ताण आणि विस्कळीत असलेली दैनंदिनी विसरुन शहर पोलीस ठाण्यात कार्यरत बहुतेक सर्व अधिकारी व अंमलदार या मिरवणुकीत सहभागी झाले असून डिजेच्या तालावर थिरकणार्‍या पोलिसांना पाहून नागरिकही आश्‍चर्यचकीत होत आहेत.


गुरुवारी (ता.28) राज्यात सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोशपूर्ण वातावरणात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. संगमनेरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 128 वर्षांचा प्रगल्भ इतिहास आहे. त्यामुळे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. नियमित घडणार्‍या घटना, गुन्हे, हातात असलेले तपास आणि वर बंदोबस्त यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांची दैनंदिनी विस्कळीत झालेली असते. नागरिकांना या उत्सवाचा आनंद निर्विघ्नपणे मिळावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डोळ्यात तेल घालून पोलीस रस्त्यावर असतात.


नागरीक ज्यावेळी आपले कुटुंब, मुलं सोबत घेवून सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे बघत असतात त्यावेळी बंद असलेल्या घरांच्या आणि रस्त्यावर असलेल्या महिला, मुले आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेवून, आपले स्वतःचे कुटुंब, मुलं-बाळं विसरुन पोलीस दादा ऊन, वारा, पाऊस असं सगळंकाही विसरुन कर्तव्यावर उभा असतो. यंदातर पोलिसांचा ताण अधिक वाढलेला होता. दहा दिवसांच्या या उत्सवादरम्यान सलग पाऊस कोसळत असल्याने वीज पुरवठ्यात सतत व्यत्यय निर्माण होत होता. त्यातून तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्याने पोलिसांची जबाबदारीही वाढली होती.


त्यातच गणेशोत्सवाच्या दुसर्‍याच दिवशी ईद-ए-मिलाद अर्थात मोहंमद पैगंबर यांची जयंती असल्याने मुस्लिम बांधवांचा जुलूस निघणार होता. त्यामुळे पोलीस दादाचा कामाचा ताणही शतपटीने वाढला होता. त्यामुळे ठाण्यात मोठ्या श्रद्धेने बसवलेल्या बाप्पांकडेदररोज सकाळी ड्युटीवर येणारा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी निर्विघ्नतेची प्रार्थना करीत. बाप्पाही भक्तांचे गार्‍हाणं ऐकून त्यांना खूष करीत होता. त्यातून निर्माण झालेला बंध सार्वजनिक उत्सवाच्या दिनीच बसलेल्या बाप्पांना दोन दिवसांची अधिकची प्रतीक्षा देणारा ठरला. बाप्पांकडे मागणं घातल्याप्रमाणे सगळंकाही सुरळीत आणि शांततेत पार पडल्याने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सार्वजनिक उत्सवाच्या संकेतांना फाटा देत आज शनिवारी (ता.30) बाप्पांच्या विसर्जनाचा मुहूर्त ठरवला.


शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना तशा सूचना देण्यात आल्या. सर्वानी पारंपरिक पोशाख घालावा असाही दंडक जारी केला गेला. ठरल्यानुसार दुपारी अधिकारी आणि अंमलदार एकसारख्या पारंपरिक पेहरावात हजरही झाले. भावपूर्ण वातावरणात उपअधीक्षक वाघचौरे यांनी सपत्निक बाप्पांची मनोभावे आरती केली. हिंदु-मुस्लिम धर्मातील मोठ्या प्रमाणात साजरे होणारे दोन पवित्र उत्सव अगदी निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल बाप्पांचे आभार मानले गेले. त्यानंतर सजवलेल्या तांत्रिक अश्‍वरथात बाप्पांना बसवून पोलीस दादा बेभान होवून बाप्पांच्या पुढे थिरकू लागले.


चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून वाजत गाजत निघालेले बाप्पा आणि त्यांच्या पुढ्यात एकाच पेहरावात नाचणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पाहून पाहणारेही थबकत आहेत. डिजेच्या तालावर एकामागून एक सादर होत असलेल्या गीतांवर पुरुष आणि महिला कर्मचारी दोघेही बेधुंदपणे नृत्य करुन आपल्यावरील कामाचा ताणही जणू विसर्जीत करण्यासाठी निघाले आहेत. एरव्ही कोणताही धर्म, पंथ आणि देव याबाबत तटस्थ असलेल्या वर्दीतल्या माणसाचे हे दर्शन संगमनेरकरांसाठी लक्षणीय ठरले आहे.

Visits: 50 Today: 1 Total: 79345

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *