मूसेवाला खून प्रकरणी आरोपीस बोटा येथून अटक पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी; 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी

नायक वृत्तसेवा, घारगाव
पंजाब येथील गायक व काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात संशयित असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे-अहमदनगर सीमेवरील बोटा शिवारात (ता. संगमनेर) बुधवारी (ता. 7) अटक केली. सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाळ (वय 19) असे आरोपीचे नाव असून, तो खून प्रकरणातील संशयित संतोष जाधव याचा साथीदार आहे.

मूसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात 29 मे, 2022 रोजी पाठलाग करून, स्वयंचलित अग्निशस्त्रातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे तीव्र पडसाद पंजाबमध्ये उमटल्यानंतर, केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास स्वतंत्र पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, दिल्लीतील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने त्याच्या सहकार्‍याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मूसेवाला यांची हत्या केल्याचे चौकशीतून पुढे आले. ही हत्या करणार्‍यांत पंजाब व राजस्थानातील प्रत्येकी तीन व पुण्यातील संतोष जाधव व सौरभ महाकाळ या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

या प्रकरणी पंजाब पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर पुणे ग्रामीण पोलीस जाधव व महाकाळ यांच्या मागावर होते. संशयित महाकाळ पुणे-नगर सीमेवरील बोटा शिवारात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने महाकाळ यास ताब्यात घेतले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *