पुणतांबा येथील शेतकरी आंदोलक बैठकीसाठी मुंबईला रवाना बैठकीत तोडगा निघाला नाही तर ग्रामसभेत पुढील निर्णय घेणार
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा येथील आंदोलक शेतकरी मुंबईकडे बैठकीसीठी रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता.7) दुपारी मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर पुणतांबा येथे बुधवारी (ता.8) होणार्या ग्रामसभेत अंतिम निर्णय घेणार असल्याचे आंदोलक शेतकर्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील शेतकर्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पुणतांब्यातील शेतकर्यांनी मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. पाच वर्षांपूर्वीही पुणतांबे येथील शेतकर्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले होते. मात्र हे आंदोलन चिघळले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने चारच दिवसांत आंदोलकांची समजूत काढली. त्यामुळे शेतकर्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आज याच मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणतांबा शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे प्रश्न सरकारच्या नऊ खात्यांशी संबंधित असल्याने या सर्व खात्यांचे मंत्री, सचिव व आयुक्त बैठकीस उपस्थित राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री दादा भुसे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर सरकारच्या निर्णयाचे स्वागत करु. अन्यथा पुढील निर्णय पुणतांबा येथील ग्रामसभेत घेणार असल्याचेही आंदोलक शेतकर्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, 1 जूनपासून शेतकरी आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथे 14 मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनाची मशाल पेटली आहे. या आंदोलनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.