दुचाकीवरुन सुसाट जाणार्‍या तरुणाईला नेवासा पोलिसांचा ‘ब्रेक’ एकाच दिवसांत 22 जणांवर कारवाई; 46 हजार 600 रुपयांचा दंड वसूल

नायक वृत्तसेवा, नेवासा
विनापरवाना दुचाकीवर सुसाट वेगाने जाणार्‍या तरुणाईला ब्रेक लावण्यासाठी अखेर नेवासा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी (ता.6) पहिल्याच दिवशी 22 जणांवर कारवाई करून तब्बल 46 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. सदर कारवाई नेवासाफाटा परिसरात करण्यात आली पुढील कारवाईचे लक्ष्य नेवासा शहरात असणार आहे.

सुसाट वेगाने दुचाकी चालविणे जणू तरुणाईचा छंद झाला आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सधन पालकही सारासार विचार न करता अल्पवयीन पाल्यांना शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासला ये-जा करण्यासाठी महागड्या दुचाकी घेऊन देतात. परंतु जबाबदारीचे कुठलेही भान नसलेली ही तरुणाई रस्त्यांवरून भरधाव वेगाने वेडी-वाकडी वाहने चालवून वाहतूक नियमांची एैशी-तैशी करतात. यामुळे भीषण अपघाताच्या दुर्दैवी घटनांत अनेकांना जीव गमवावा लागत आहेत. या सुसाट तरुणाईची मोठी समस्या या परिसराला चांगलीच भेडसावत होती. या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अल्पवयीन तरुणाईला विनापरवाना वाहन चालविण्यास दिल्याबद्दल त्यांच्या पालकांनाच दोषी धरून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची तरतूद काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. मात्र ‘मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण’ या उक्तीप्रमाणे या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नव्हते.

नेवासा पोलीस ठाण्यात विजय करे रुजू झाल्यानंतर त्यांनी परिसरातील ही समस्या हेरून अशाप्रकारे विनापरवाना भरधाव वाहने चालविणार्‍या सुसाट तरुणाईवर कारवाईचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तब्बल 22 जणांवर कारवाई करून 46 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल आहे. नेवासा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अल्पवयीन तरुणाईचे चांगलेच धाबे दणाणले असून पालकांनीही त्याचा धसका घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. पोलीस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गावंडे, पोलीस हवालदार गणेश गलधर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी सुरू केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत असून या कारवाईची व्याप्ती व तीव्रता वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.

Visits: 79 Today: 1 Total: 1109703

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *