श्रीरामपूरमध्ये अवैध कत्तलखान्यावर छापा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील प्रभाग दोनमधील बाबरपुरा येथील अवैध कत्तलखान्यावर श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 200 किलो गोमांस व एक वाहन असा एकूण 6 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना प्रभाग दोनमध्ये गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार बाबरपुरा येथे दोन पंचांसह पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक आरोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस नाईक भैरवनाथ अढांगळे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी छापा टाकून समीर मुराद कुरेशी (वय 27) व मोहसीन इस्माईल कुरेशी उर्फ बुंदी यांच्या ताब्यातून 26 हजार रुपयांचे 200 किलो गोमांस व 6 लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकूण 6 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघा आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 397/2022 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कलम 5, 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.