कोठे बुद्रुकला वादळी वार्यासह मुसळधार पावसाने झोडपले जर्शी गायीचा मृत्यू तर घरांचे पत्रे उडून पिकांचेही मोठे नुकसान

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक गावाला सोमवारी (ता.6) वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून आंब्याचे झाड पडून जर्शी गायीचा मृत्यू झाला आहे. तर घरांचेही पत्रे उडाले आणि पिकांचेही मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोठे बुद्रुक येथील आदिनाथ उत्तम वाकळे यांनी सोमवारी दुपारी जर्शी गाय आंब्याच्या झाडाखाली बांधली होती. मात्र दुपारी वादळी वार्यासह मुसळधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने आंब्याचे झाड थेट गायीच्या अंगावर पडून गायीचा जागीच मृत्यू झाला. यात वाकळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वार्याचा वेग प्रचंड असल्याने सुनील मार्तेंड आरोटे यांच्या राहत्या घराचे जवळपास पंधरा पत्रे उडून गेले आहे. त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

याचबरोबर या वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकर्यांनी आपल्या कांदाचाळी झाकून ठेवल्या होत्या. मात्र या वादळी वार्याने कांद्यावरचे कागदही उडून गेले आहेत. तसेच परिसरात काही ठिकाणी गाराही पडल्याने याचा फटका डाळिंबासह आदी पिकांना बसणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. या नुकसानीची प्रशासनाने पाहणी तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
