नाऊर बंधार्‍याच्या फळ्या चोरण्याचा प्रयत्न फसला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील नाऊर येथील गोदावरी पात्रामध्ये असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या निकामी सुमारे 22 फळ्या चोरून नेण्याचा प्रयत्न जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांनी या फळ्या चोरून नेणार्‍या वाहनाचा सुमारे 10 ते 11 किलोमीटर पाठलाग करून हे वाहन अडविले व चोरट्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

नाऊर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या फळ्या रात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चोरून घेऊन जात असता काही सतर्क नागरिकांनी पाहिले. चोरट्यांच्या ताब्यात असलेले वाहन (क्र. एमएच.12, क्यूडब्लू.7271) थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर चोरट्यांनी अशोक लेलंड कंपनीचे हे वाहन वेगाने पळविल्याने ग्रामस्थांना शंका आली. सदर वाहनाचा मोटरसायकलवरून पाठलाग करून उंदिरगाव भागात असलेल्या काही नागरिकांना या घटनेची कल्पना दिली. सुमारे 10 ते 11 किलोमीटर पाठलाग करत संबंधित वाहन पकडून चोरट्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान यापूर्वी देखील तीनदा येथील बंधार्‍याच्या लोखंडी फळ्याची चोरी झाली असून आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. सातत्याने याच बंधार्‍याच्या फळ्या चोरी जात असून या बंधार्‍यालगत पूर्वी असलेली इमारत पुन्हा बांधली तर बर्‍याचअंशी चोर्‍या थांबण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर 173/2022 कलम 379, 511, 34 प्रमाणे शासकीय लोखंडी प्लेटची चोरी केली म्हणून कैलास भागवत बोर्डे यांच्या फिर्यादीवरून आरोपी इलिहास मेहमूद शेख (वय 24, श्रीरामपूर), महेश सुनील साठे (वय 24, हरेगाव, श्रीरामपूर), आनंदा बाळू साळवे (वय 33, हरेगाव, श्रीरामपूर) यांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबरचे इतर 3 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश गोरे व पोलीस नाईक दादासाहेब लोंढे हे करत आहे.

Visits: 83 Today: 2 Total: 1109323

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *