संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम, सर्वांचे पैसे परत मिळतील : कुटे दूधगंगा पतसंस्था अपहार; प्रसिद्धी पत्रकाद्वारे अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही केले आवाहन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दूधगंगा पतसंस्थेची नाळ ग्रामीणभागातील शेतकरी व छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांशी जोडली गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने सहकार क्षेत्रात विश्वसनीय काम केले आहे. संस्थेच्या चार हजार सभासदांसह असंख्य शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणार्‍या आपल्या सर्वांच्या या संस्थेत व्यवस्थापक व काही कर्मचार्‍यांनी संगनमत करुन अफरातफर केली आहे, मात्र ती रक्कम खूप कमी आहे. संस्थेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास दूधगंगा पतसंस्था आर्थिक सक्षम आहे. अपहाराबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्याने ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे, मात्र कोणीही गडबडून जावू नये. कोणाच्याही एकाही रुपयाचे नुकसान होणार नाही. संस्थेने मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण केलेले असून त्याच्या वसुलीतून प्रत्येकाला आपली जमापुंजी परत मिळेल. कोणत्याही स्थितीत शेतकर्‍यांची ही कामधेनू बुडीत होवू देणार नाही असा ठाम विश्वास दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

संगमनेरातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे गोंधळलेल्या ठेवीदारांनी आपापल्या रकमा काढण्यासाठी संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये गर्दी केल्याने गोंधळ उडाला आहे. प्रत्यक्षात संस्थेकडे शिल्लक स्वरुपातील रोकड नसल्याने ठेवीदारांना आजच्यामितीस पैसे देता येणे शक्य नाही, मात्र संस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत व त्याद्वारे कर्जही मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यात आले आहे. त्या तुलनेत अपहार झालेली रक्कम खूपच कमी असल्याने त्याचा संस्थेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही गंभीर परिणाम होणार नसल्याचे भाऊसाहेब कुटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हंटले आहे.

याबाबत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, तालुक्यातील दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराबाबत संचालक मंडळाने स्थानीक लेखापरिक्षकाची नेमणूक करुन चौकशी केली असता संस्थेचा व्यवस्थापक व काही कर्मचार्‍यांनी संगनमताने अपहार केल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सहकार खात्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपली संस्था सहकार क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. दूध उत्पादक, छोटे-मोठे व्यापारी व अन्य घटक असे एकूण चार हजारांहून अधिकजण संस्थेचे सभासद आहेत.

या संस्थेची स्थापना शेतकरी वर्गाला शेती व जोडधंदा या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी झाली आहे. संस्थेच्या उद्देशानुसार आजवरची वाटचाल सुरू असून संस्थेची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी जमा होत्या, त्यातून मोठ्या प्रमाणात कर्जेही वितरीत करण्यात आली आहेत. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना संस्थेत अपहार झाल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्याने ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ज्यांनी मागणी केली त्यांची मागणी संस्थेतील शिल्लक रकमेतून पूर्ण करण्यात आली आहे.

मात्र यानंतरही अफवा थांबत नसल्याने संस्थेतून आपापली रक्कम काढणार्‍यांची संख्या वाढतच आहे. पर्यायाने संस्थेकडे रोकड शिल्लक नाही. वास्तविक पाहता अपहार झालेली रक्कम खूप कमी असल्याने त्याचा संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या गेल्याने लोकांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. तरी कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही स्थितीत संस्थेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाला आम्ही तडा जावू देणार नाही. ही संस्था आपल्या सर्वांची कामधेनू आहे. त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या विकासात संस्थेचा हातभार लागला आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. या संस्थेची नाळ ग्रामीणभागाशी जोडलेली असल्याने लोकांचा संस्थेवर मोठा विश्वास आहे. त्यांच्या या विश्वासाला आम्ही कोणत्याही स्थितीत तडा जावू देणार नाही. संस्थेने सभासदांना मोठ्या प्रमाणात तारणी कर्ज दिले आहे. त्या कर्जाची काही प्रमाणात थकबाकीही आहे, तर काहींचे कर्ज नियमीत सुरू आहे. कर्जदारांची गरज ओळखून संस्थेने त्यांना मदत केली आहे. आता संस्था अडचणीत असतांना कर्जदारांनी प्रामाणिकपणे आपल्या कर्जरकमेचा भरणा करणे अपेक्षित आहे. संस्थेच्या कर्ज वसुलीसाठी यापुढे कलम 101 व 91 नुसार कारवाईलाही सुरुवात करण्यात येणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत संस्थेला बुडीत होवू देणार नाही असा विश्वास यानिमित्ताने आम्ही पुन्हा पुन्हा देत आहोत. आपली संस्था लवकरच पूर्वपदावर येईल. त्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करीत असून प्रत्येकाचे पैसे सुरक्षित आहेत हा विश्वास कायम ठेवण्याचे भावनिक आवाहनही दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी संस्थेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहकांना केले आहे. आजपासून संस्थेने आपल्या शाखाही सुरू केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *