खोट्या तक्रारीची भीती दाखवून वृद्धाची साडेपाच लाखांची फसवणूक कथित पत्रकार खंडणीखोराच्या अकोले पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नायक वृत्तसेवा, अकोले
वृद्ध व सूनेमध्ये मालमत्तेच्या वाटपावरुन गृहकलह सुरू होता. या वादाचा फायदा घेवून एका कथित पत्रकाराने वृद्धास राज्य महिला आयोग व पोलिसांची भीती दाखवून तब्बल 5 लाख 35 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सचिन बाळू रेवगडे (वय 28, रा.हिवरगाव आंबरे, ता.अकोले) याने संबंधित तक्रारदार वृद्धास तुमच्या विरुद्ध तुमच्या सूनेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असून त्यात तुम्हाला वीस वर्षे शिक्षा होईल अशी भीती घातली. तसेच राज्य महिला आयोगाच्या नावे बनावट कागदपत्र व शिक्के तयार करुन खोट्या सह्या केल्या. यावरून सदर वृद्धास वेळोवेळी फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून असहाय्यतेचा फायदा घेवून 5 लाख 35 हजार रुपयांची खंडणी गोळा केली.
यावरच न थांबता अधिक पैशांच्या लालसेपोटी वृद्धास पुन्हा पैशांची मागणी करु लागला असता वृद्धाने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून अकोले पोलिसांनी गुरनं. 239/2022 भा.दं.वि. कलम 420, 471, 472, 473, 384, 385 प्रमाणे गुन्हा दाखल करुन खंडणीखोर सचिन रेवगडे यास जेरबंद केले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता प्रथम 1 जूनपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा वाढ करण्यात आली असून, 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये असताना खंडणी घेतलेल्या रकमेपैकी 1 लाख 50 हजार रुपये, संगणक, पेनड्राईव्ह, बनावट रबरी शिक्का, राज्य महिला आयोगाचे नावाने बनविलेले कागदपत्रे, गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन व एक चारचाकी वाहन असा एकूण 5 लाख 50 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपीने त्याच्या मोबाईलद्वारे 8 वेगवेगळ्या नावाचे बनावट ई-मेल आयडी तयार करुन त्यावरुन खोट्या स्वरुपाच्या तक्रारी महिला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदविल्या आहेत. तसेच आरोपीने महाराष्ट्रातील नामांकित वृत्तवाहिन्यांचे न्यूज ब्लॉग तयार करुन व नामांकित वृत्तपत्रात बनावट बातमी तयार करुन खोट्या बातम्या प्रसारित करुन फिर्यादीस खंडणी देण्यास भाग पाडले आहे. सदर आरोपीने यासारखे अजून गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्याबाबत पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पोलीस नाईक विठ्ठल शेरमाळे, अजित घुले, पोलीस शिपाई सुयोग भारती, आत्माराम पवार, संदीप भोसले, प्रदीप बढे, पोलीस नाईक फुरकान शेख यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करत आहे.
प्रारंभी अकोले पोलिसांकडून या प्रकरणातून कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न होत होता. परंतु, थेट पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घातल्याने अकोले पोलीस या प्रकरणातील साखळी कशी जोडतात आणि मोठे मासे कसे उघड करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.