आधार फाउंडेशकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आधार फाउंडेशन संगमनेरच्यावतीने करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक म्हणजे चैतन्याचा झरा व अनुभवांची शिदोरी असलेली व्यक्तिमत्वे होय. आधार परिवारात ज्येष्ठ नागरिकांचे तन-मन-धनाने योगदान नेहमीच राहिलेले आहे. ज्येष्ठांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करावा, अशी संकल्पना आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांची होती. त्याप्रमाणे कृष्णा गार्डन हॉलमध्ये या छोटेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक प्रा. चं. का. देशमुख हे होते. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, वनस्थळीच्या संचालिका पुष्पा निर्हाळी, प्रा. आर. वाय. कमलाकर, दत्तात्रय रसाळ, शिवव्याख्याते दीपक कर्पे, उद्योजक राजाभाऊ सोमाणी, उल्हाससिंग परदेशी, सुभाष ताजणे, देवीदास गोरे, कारभारी देव्हारे, डॉ. किशोर पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी करून आधारचा लेखाजोखा मांडला. माजी प्राचार्य पी. आर. शिंदे, अरविंद गाडेकर, शशीकांत कंकरेज, सुभाष पाराशर यांनी मनोगत व्यक्त केले. आधार फाउंडेशनचा वटवृक्ष कसा झाला, याचे विवेचन किसन हासे यांनी केले. कळसकर गुरुजी यांनी सर्वांना शुभाशीर्वाद दिले. आधारचं कार्य मानवतावादी दृष्टीकोन जोपासत पुढे चाललं आहे. आजपर्यंत शेकडो अनाथ, निराधार मुलांचे शैक्षणिक मागासलेपण दूर केले आहे, असे प्रतिपादन प्रा. चं. का. देशमुख यांनी केले. संगीत शिक्षक विनोद राऊत यांनी सर्वांना गीतातून संगीतमय शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत रेणुका डंग यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. सर्व उपस्थित जेष्ठ नागरिकांचा सन्मान आधार परिवाराच्यावतीने आरोग्य संपदा हे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला. आधार परिवाराच्या या सन्मानाने ज्येष्ठ नागरिक भारावून गेले. सन्मानानंतर ‘माझा भविष्यकाळ मी रोज पाहतो’ या गीताच्या ओळींचे गायन करण्यात आले.या ओळी ओठावर पुटपुटतच सर्व सत्कारमूर्तींनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारचे समन्वयक डॉ. महादेव आरगडे, पी. डी. सोनवणे, लक्ष्मण कोते, बाळासाहेब पिंगळे, तानाजी आंधळे, भानुदास झंजाड, श्रीकांत बिडवे, नामदेव सानप, उत्तम देशमुख, यश सब्बन यांसह सर्व शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल कडलग यांनी केले.