वीरभद्रसह नवनाथ देवतांच्या यात्रौत्सवास सुरूवात बुधवारी काल्याच्या कीर्तनाने होणार यात्रौत्सवाची सांगता

नायक वृत्तसेवा, राहाता
येथील वीरभद्र व नवनाथ देवतांच्या यात्रा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून दोन वर्षांच्या करोना काळाच्या प्रतीक्षेनंतर नवसपूर्ती करण्यासाठी हत्तीच्या आकाराची प्रतिकृती तयार केलेल्या गळवंती रथाला गळी लागून हजारो भाविकांनी आपली नवसपूर्ती केली. तर काट्यांचा नाच व डफांच्या तालावर कलगीतुरा, मानाच्या छत्री व देवतांच्या मुखवटा मिरवणूक, पेढे व गुळ (शेरणी) वाटप, शोभेचे दारूकाम, डफांचा खेळ अशा विविध कार्यक्रमांनी वीरभद्र व नवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

प्रत्येक वर्षी येणार्या चैत्र पौर्णिमेला शहरात श्री वीरभद्र व नवनाथ देवांची यात्रा असते. यावर्षी शनिवार (ता. 16) व रविवार (ता. 17) राहाता शहरात उत्साहाच्या वातावरणात यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. शनिवारी सायंकाळी 6 वीरभद्र मंदिरासमोर शहराच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करून पुरुष व स्त्री वेशातील बालकांना रथाला गळी लावून चार बैलांच्या साहाय्याने रथाची मिरवणूक, डफांच्या तालावर काट्यांचा नाच, गुलालाची उधळण, बोल बिरोबा की जय, बोल मायंबा की जय घोष करीत वीरभद्र मंदिरासमोरून गळवंती राजाची मिरवणूक नवनाथ मंदिर समोर नेण्यात आली. तसेच दुसर्या दिवशी रविवारी सायंकाळी 6 वाजता नवनाथ मंदिरापासून ते राहाता वीरभद्र मंदिरासमोर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर मानाच्या काठ्यांचे पूजन व रात्री 9 ते पहाटेपर्यंत डफांचा खेळ व कलगीतुरा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

सोमवारी पहाटे मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत यांचे भाकीत होणार असून याबरोबरच सोमवारी सायंकाळी जंगी कुस्त्यांचा हगामा व मंगळवारी बैलगाडा शर्यत, बुधवारी काल्याच्या कीर्तनाने या यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे. प्रशासक चंद्रकांत चव्हाण, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, अॅड. नारायण कार्ले, अॅड. रघुनाथ बोठे, सोपान सदाफळ, मोहन सदाफळ, वीरभद्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, कैलास सदाफळ, साहेबराव निधाने, धनंजय गाडेकर, भागुनाथ गाडेकर, वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, डॉ स्वाधीन गाडेकर, ज्ञानेश्वर सदाफळ, राहुल सदाफळ, अजय आग्रे, मुन्ना सदाफळ आदी उपस्थित होते.
