इथेनॉलची दहा पटीने अधिक निर्मितीची गरज ः गडकरी केदारेश्वर साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन

नायक वृत्तसेवा, शेवगाव
‘साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा. पेट्रोलऐवजी शंभर टक्के बायोइथेनॉल वापरता येणे शक्य आहे. सध्या देशात 450 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होते. आगामी काळात बहुतेक वाहने इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सध्याच्या निर्मितीपेक्षा दहा पटीने अधिक निर्मितीची गरज आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 30 केएलपीडी क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी गडकरी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे दिल्लीतून भाषण केले. कारखाना कार्यक्षेत्रावर या प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री बबनराव ढाकणे, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिल्लीतील कार्यक्रमांमुळे गडकरी येथील कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे भाषण केले. ते म्हणाले, की संघर्षयोद्धा म्हणून बबनराव ढाकणे यांचा परिचय आहे. ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या संपादित ग्रंथाचे प्रकाशन झाले. हा ग्रंथ तरुणांना प्रेरणादायी ठरेल. ढाकणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखाना चालविला. देशात सध्या साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त आहे. 40 हजार कोटींची साखर निर्यात केली आहे.
